पिंपरी : गॅस एजन्सीमधील रोकड बँकेत भरण्यासाठी जात असताना कॅशिअरच्या डोळयात मिरचीपूड टाकून अडीच लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना चिंचवड येथील दळवीनगर पुलाजवळ गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. जावेद इद्रीस शेख (वय १९), मुर्तजा, मोहम्मद मुतुर्जा आकसापुरे (वय २२), दीपक कालीदास तेलंग (२२), विजय लहू शिंदे (वय १९, सर्व रा. थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुहास पांडुरंग मोहिते (वय ४०, रा. सेक्टर क्रमांक २८, गंगानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहिते हे काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सी येथे कॅशिअर म्हणून नोकरीला आहेत. गुरुवारी रात्री ते गॅस एजन्सीतील २ लाख ५६ हजार ४५७ रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी घेवून जात होते. दरम्यान, दळवीनगर येथील जय गणेश व्हिजन इमारतीजवळील दळवीनगर पुलाजवळील रस्त्यावर एका गरीब महिलेला दहा रुपये देण्यासाठी फिर्यादी मोहिते थांबले होते. दरम्यान, दुचाकीवरुन आलेले आरोपी त्यांच्याजवळ थांबले. त्यापैकी एकाने मोहिते यांच्या डोळयात मिरचीपूड टाकली. तर दुसऱ्या एकाने मोहिते यांचा पाठलाग करुन कोयत्याचा धाक दाखविला. तिसरया आरोपीने त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील रोकड लंपास केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
डोळयात मिरचीपूड टाकून अडीच लाखांची रोकड लुटणारे चौघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 3:21 PM
गॅस एजन्सीमधील रोकड बँकेत भरण्यासाठी जात असताना कॅशिअरच्या डोळयात मिरचीपूड टाकून अडीच लाखांची रोकड लुटली होती.
ठळक मुद्दे फिर्यादी काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सी येथे कॅशिअर म्हणून नोकरीला