उल्हासनगर - एका केबल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी एक पोर्टल चॅनेलच्या पत्रकारासह चार साथीदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गेल्या महिन्यात अश्याच पत्रकार व माहिती कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोर्टर चॅनल व तथाकथित पत्रकारामुळे व्यापारी, बिल्डर आदीजण हैराण झाले आहे.
उल्हासनगरातील केबल चालक व व्यावसायिक नरेश रोहिडा यांची तथाकथित ३ पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेउन तू क्रिकेटचा बुकी, गुटख्याचा व्यापारी असल्याचे सांगितले. आमच्या पत्रकार संघात दुबे आणि मिश्रा हे पत्रकार असल्याची बतावणी केली. याबाबतचे चित्रण सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे जमा करण्यात आल्याचे रोहिडा यांचे म्हणणे आहे. दरम्यान दुबे याच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने २०००/- रुपये जमा केल्याचे आणि काढल्याचे स्टेटमेंट सुद्धा पोलीसांना दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०६/२०२०, कलम ३८५ /३४ प्रमाणे नोंदविण्यात आले आहे.सदर प्रकरणात तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने हे करीत असून पत्रकार दूबे यांच्यासह त्याचे इतर सहकारी 3 पत्रकारांचा पोलीस शोधत आहेत.