कल्याण- एका तरुणाने प्रेम विराहामुळे प्रेयसीच्या नवीन प्रियकराची हत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली होती. भर रस्त्यात घडलेल्या या.घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. अवघ्या 24 तासात पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित उजैनकर याच्यासह त्याचे साथीदार नकुल भोईटे, राहुल चव्हाण आणि सागर गांगुर्डे यांना अटक केली आहे.
कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची चाकूने हल्ला करत काहीजणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. आदित्य बर असे मयत तरुणाचे नाव हाेते. ही हत्या ललित उज्जैनकर व त्याच्या साथीदारांनी केल्याचे तपासात उघड झाले. ललित उज्जैनकर याचे दिवा येथे राहणाऱ्या एका तरुणीशी काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. काही कारणास्तव या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर तरुणीची गोवंडी येथे राहणाऱ्या आदित्य याच्याशी मैत्री झाली. प्रेम संबंध तुटल्याने ललित उज्जैनकर हा संतापला होता. ललितकडे तरुणीच्या भावाचा कुत्रा सांभाळण्यासाठी दिला होता.
शनिवारी रात्रीच्या सुमारास तरुणी आणि आदित्य हे दोघे हा कुत्रा घेण्यासाठी खडेगोळवली परिसरात आले. यावेळी ललितचा तरुणी आणि आदित्य सोबत वाद झाला. या वादातून ललितने आपल्या साथीदारांसह आदित्यवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आदित्यचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ललित आपल्या साथीदारांसह पसार झाला होता.. कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत ललित उज्जैनकर व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. ललितचा एक साथीदार अवघ्या काही तासातच पोलिसांच्या हाती लागला त्याने दिलेल्या माहितीनुसार उर्वरित ललित व त्याचे साथीदार हे मध्य प्रदेश येथे पळून गेले होते. पोलीस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या पथकाने २४ तासाच्या आत चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी कौतुक केले आहे.