सातारा : सातारा जिल्हा पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी सातारा शहर परिसरात चौघांना पकडून चार पिस्टल आणि आठ काडतुसे जप्त केली. सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यांतील चौघांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यामध्ये चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केली आहे. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले आहे. असे असतानाच ३० डिसेंबरला पोलिस निरीक्षक देवकर यांना दोघेजण एका दुचाकीवरून सातारा शहरातील शिवराज पेट्रोल पंपाजवळ देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती.
या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी कारवाईसाठी सहायक पोलिस निरीक्षक तासगावकर आणि पोलिस उपनिरीक्षक पाटील यांना सूचना केली. त्याप्रमाणे पथकाने शिवराज पेट्रोल पंप परिसरात सापळा लावला. त्यावेळी दुचाकी (एमएच ४२, एव्ही १९१५)वरून आलेल्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि सहा काडतुसे, एक मोबाईल व दुचाकी असा एकूण २ लाख १६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे अधिक माहिती घेतली असता त्यांनी आणखी दोन साथीदार सातारा शहराजवळील वाढेफाटा येथे असून त्यांच्याकडे दोन पिस्टल असल्याची माहिती दिली. त्यानुसार हे पोलिस पथक वाढेफाटा येथे गेले व दोघांनाही पकडले.
वाढे फाटा येथून दोन पिस्टल, दोन काडतुसे, एक मॅक्झिन, दोन मोबाईल, दुचाकी असा २ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी केलेल्या कारवाईत चार पिस्टल, आठ काडतुसे, एक मॅक्झिन, तीन मोबाईल आणि दोन दुचाकी असा ४ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
गणराज वसंत गायकवाड ( वय २०, रा. काळे वस्ती, दौंड, जि. पुणे), अदित्य तानाजी गायकवाड (२०, रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), वैभव बाळासो वाघमोडे (२०, रा. शैलाभाभी दूध डेअरीजवळ बलगवडे, ता. तासगाव, जि. सांगली) आणि स्वप्निल संजय मदने (२९, रा. गणेश चित्रमंदिर समोर रामानंदनगर किर्लोस्करवाडी, ता. पलूस, जि. सांगली यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन महिन्यांत १२ पिस्टल जप्त
सातारा जिल्हा पोलिस दलाने अवैध शस्त्रे बाळगण्यावर कारवाई तीव्र केली आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलिस ठाण्याच्या वतीने १९ व्यक्तींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून १२ देशी बनविण्याचे पिस्टल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.