अहमदनगर: वाळूतस्कराला सोडून दिल्याप्रकरणी तिघे तर गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी एक, अशा कोतवाली पोलिस स्टेशनच्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी गुरुवारी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
पी. बी. भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव व किरण बारवकर असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिस कर्मचारी भांबरकर यांनी पैसे घेऊन एका वाळूतस्कराला सोडून दिल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांनी कसुरी अहवाल प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रकरणात तथ्य आढळल्याने पोलिस अधीक्षक पाटील यांनी भांबरकर यांच्यासह वाळू संदर्भात कारवाई करण्यात सहभागी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्याचे आदेश काढले. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गांजाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी किरण बारवकर याला निलंबित करण्यात आली आहे.
दरम्यान पैसे घेऊन कोतवाली पोलिसांनी वाळू तस्करीतील आरोपी सोडून दिल्याचे प्रकरण लोकमतने 15 जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणले होते.