भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये हायप्रोफाईल हनीट्रॅप करणाऱ्या चार महिलांना त्यांच्या कुटुंबीयांसह घरांमधून ताब्यात घेण्यात आले आहे. चारही महिला इंदौरच्या बड्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप झाला होता. अटकेबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
एटीएसने भोपाळ पोलिसांच्या मदतीने रिव्हेरा टाऊन आणि मीनाल रेसिडेन्सीयेथील दोन घरांमध्ये कारवाई करण्यात आली. या चार महिलांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले असून ते हनीट्रॅपकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. मात्र महिला चौकशीवेळी या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हणत आहेत. ही टोळी इंदौरचे मोठे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या जाळ्यात ओढत होती आणि ब्लॅकमेल करत होती.
एटीएसला इंदौरच्या पोलिसांनी टीप दिली होती. भोपाळच्या रिव्हेरा टाऊन आणि मीनाल रेसिडेन्सीमध्ये चार महिला थांबलेल्या आहेत. एटीएसने बुधवारी मध्यरात्री ही कारवाई केली. तेथून महिलांना अशोका गार्डन ठाण्यामध्ये नेण्यात आले. यानंतर गोविंदपुरा ठाण्यामध्ये नेत त्यांची चौकशी सुरू होती.
या महिलांचे लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये मोठमोठ्या रकमा वळत्या केलेल्या आहेत. याचीही चौकशी केली जात असून त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाहीय. एवढे पुरावे दाखवूनही या महिला आरोप नाकारत आहेत. इंदौर पोलिस निघाले असून ते पोहोचायला वेळलागणार आहे. इंदौरमध्ये या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.