ठाणे - गेल्या चार वर्षापासून बेपत्ता झालेल्या सुमेध फलचंद्र चंद्रा (15) याचा अत्यंत कौशल्याने शोध घेण्यात ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला गुरुवारी यश आले. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. विशेष म्हणजे त्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याची बतावणी करणाऱ्या तिघांनाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे. मुलाचा शोध लागण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणीही त्याच्या वडीलांनी न्यायालयात केली होती.
ठाण्याच्या पोखरण रोड येथील वसंतविहार भागात राहणाऱ्या सुमेधचे अपहरण झाल्याची तक्रार 27 मार्च 2015 रोजी त्याचे वडील फुलचंद चंद्रा (48) यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 1 एप्रिल 2015 रोजी या सुमेधच्या सुटकेसाठी एक लाखांच्या खंडणीचा कॉल एका अनोळखीने फुलचंद्र यांना केला होता. या प्रकरणाचा शोध घेतल्यानंतर कळवा, वाघोबानगर येथील नरेंद्र जयस्वाल याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाला 7 एप्रिल 2015 रोजी ठाणो पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 2017 मध्ये कलीम अन्सारी यालाही याच प्रकरणामध्ये अटक झाली होती. परंतु, सुमेध हा बेपत्ता असल्याचे पोस्टर चिटकविणा:याने त्यावरील पालकांचा मोबाईल क्रमांक घेऊन मित्रंच्या मदतीने फुलचंद चंद्रा यांना एक लाखांच्या खंडणीचा फोन केल्याचे चौकशीमध्ये उघड झाले. तिघांनाही याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यातील कलीम याचा फोनवरुन धमकी दिल्याचा आवाजही उघड झाला होता. पण, मुलाचा शोध न लागल्यामुळे फुलचंद यांनी ठाणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन हा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे 28 जुलै 2015 रोजी केली होती. त्यामुळे हा तपास तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सहायक आयुक्त भरत शेळके यांच्याकडे सोपविला होता. न्यायालयाकडूनही या तपासावर निगराणी होती. या तपासाचा न्यायालयाने आढावा घेऊन हा तपास सीबीआय किंवा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग न करता तो ठाणो पोलिसांकडे ठेवला. शळके यांच्या निवृत्तीनंतर हे प्रकरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार आणि उपायुक्त देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक तपास करीत असतांना सुमेध याने 22 जानेवारी 2019 रोजी नवी मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेरुळ शाखेत खाते उघडल्याची माहिती दौंडकर यांना मिळाली. तिच्या आधारे दौंडकर यांच्यासह पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर, हवालदार धनाजी हवाळ आणि वर्षा माने यांच्या पथकाने आज सकाळी 10.35 वाजताच्या सुमारास तो नेरुळच्या शाखेत आला असता, त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. कोणत्याही प्रकारचे अपहरण झालेले नव्हते. नववीमध्ये नापास होईल, या भीतीपोटी 2015 मध्ये घरातून निघून गेल्याची कबूली त्याने दिली. नेरुळ येथील शिरवणो भागात तो वास्तव्य करीत होता. तिथेच कॅटरींगचे काम करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलगा सापडल्याचे ठाणो पोलिसांनी त्याच्या वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त फणसळक, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांचे पाय धरुनच आभार मानले. मुलगा परत सुखरुप मिळाल्याने त्याच्या आईवडीलांना आनंदाश्रू आवरता आले नाही. अत्यंत चिकाटीने आणि मेहनतीने कौशल्यपूर्ण तपास करणाऱ्या दौंडकर यांच्या पथकाचे पोलीस आयुक्तांनीही विशेष कौतुक केले.