पुणे : विमान तिकीटाच्या नावाखाली एका एजंटने दुसऱ्या एजंटलाच ३८ लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे़. कोंढवा पोलिसांनी नदीफ शेख (रा. अंधेरी मुंबई), हिमांशु हाथी व त्याची पत्नी (रा.अहमदाबाद, गुजरात) या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यत आला आहे.याप्रकरणी अरबाज मुस्ताफ शेख (वय २९ ,रा. उंड्री पिसोळी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१७ पासून सुरु होता़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज शेख हे देखील कमिशनवर विमान तिकीटे बुकिंगचा व्यवसाय करतात. मात्र, त्यांच्याकडे तिकीटे बुक करण्याचा परवाना नसल्यामुळे ते मुंबईतील नदीफ तसेच अहमदाबादच्या हिमांशु या एजंटकडून तिकीटे बुक करत होते. मागील अनेक दिवसापासून ते ऐकमेकांच्या परिचयाचे असल्यामुळे आर्थिक व्यवहार त्यांच्यात सुरु होता़. शेख यांनी त्यांच्याकडे विमान प्रवासाची तिकीटे बुक केल्यानंतर प्रवासाच्या आदल्या दिवशी तिकीटे बुक झाली नसल्याचे ते सांगत असे. मात्र, त्या तिकीटांचे पैसे परत देत नसे़ त्यामुळे शेख यांना इतर लोकांकडून जादा दराने तिकीटे बुक करत होता. असे करत-करत आरोपींनी शेख यांचे २०१७ पासून तब्बल ३८ लाख ४९ हजार ६ रुपये त्यांच्याकडे ठेवले. सुरूवातीला शेख यांना आरोपीच्या बाबती विश्वास वाटत असल्यामुळे पैसे मिळतील असे वाटत होते. पैसे मिळावे, यासाठी त्यांनी फोन, ई मेलवरुन संपर्क साधला़. मात्र, ते वेगवेगळी कारणे सांगून आज देतो, उद्या देतो असे सांगत़ अनेक दिवस वाट पाहून देखील पैसे मिळत नव्हते. त्यात यातील एका आरोपीच्या विरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल झाल्याची माहिती शेख यांना मिळाली़. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसात गुन्ह दाखल केला.
तिकीट बुकिंगच्या नावाखाली एजंटलाच घातला ३८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 7:55 PM