मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा: भाड्याचे ऑफिस थाटून परदेशात गरीब मुलांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी बोरिवली रेल्वे स्थानकातून पकडले आहे. या आरोपींनी किती गरीब मुलांची आर्थिक फसवणूक केली आहे याचा तपास नालासोपारा पोलीस करत आहे.
नालासोपाऱ्याच्या सोनल शॉपिंग सेंटरमध्ये भाड्याने ऑफिस घेऊन दोन आरोपींनी मुलांकडून पासपोर्ट आणि गुगल पे या ऍपद्वारे २ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा नालासोपारा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. याबाबत तक्रार अर्जही मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेमध्ये प्राप्त झाला होता. सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलांकडे सखोल चौकशी करून फसवणूक करणाऱ्या आरोपीबाबत माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणावरून संशयित आरोपींचा सतत १० दिवस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग केला. गुरुवारी बोरिवली रेल्वे स्थानकातून दिनेशचंद्रा प्रजापती उर्फ गुड्डू आलम (३२) आणि मनोज खंबायत (३१) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर बऱ्याच मुलांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींचा ताबा नालासोपारा पोलिसांना गुरुवारी रात्री दिला.
दोन्ही आरोपींना शुक्रवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. आरोपींकडून ११ पासपोर्ट हस्तगत करण्यात आले आहे. या दोघांनी किती मुलांची फसवणूक केली याचा तपास करत आहे. - विलास सुपे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)