मीरारोड - पत्नी मंत्रालयात आहे सांगून मंत्रालयात नोकरीचे खोटे नियुक्ती पत्र देऊन ४ लाख २० हजार रुपयांना फसवणाऱ्या दाम्पत्यासह साथीदारावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ह्या दाम्पत्याने अनेकांना फसवल्याची शक्यता आहे .
भाईंदर पश्चिमेच्या मुर्धा गावात राहणारा निकी दिनानाथ भोईर (३०) उत्तन येथील बँड पथकात वाजंत्रीचे काम करतो. त्या बँड पथकात सागर कासारे हा रिदम सेक्शन वाजवत असल्याने दोघांची ओळख झाली. राई येथे राहणाऱ्या सागर ने २०१९ साली त्याची पत्नी प्रीती मंत्रालयात कामाला असून तिची खूप ओळख सांगितले. निकी ने नोकरी बघण्यास सांगितले असता मंत्रालयात नोकरी असून १ लाख २० हजार खर्च असून सुरुवातीला ८० द्यावे लागतील सांगितले. निकी व कुटुंबीयांनी त्यास होकार देत ८० हजार सागर घरी येऊन घेऊन गेला . तर प्रितीने निकी याला चर्चगेट येथे बोलावून एका बंद कार्यालयाजवळ नेऊन एका इसमाशी भेट घालून दिली व काम झाले असल्याचे सांगून त्या इसमाने उर्वरित ४० हजार घेतले.
त्यानंतर मात्र नोकरीला लावण्यास वेगवेगळी करणे सांगून टाळाटाळ चालवली. काही दिवसांनी मंत्रालयात लिपिक म्हणून काम झाले असल्याचे सांगून ७ लाख खर्च सांगितले. त्यातले ३ लाख आता व ४ लाख नंतर देण्यास सांगितले. भोईर कुटुंबीयांनी सुद्धा कासारे दाम्पत्यावर विश्वस ठेवला. काही दिवसात मंत्रालयात लिपिक म्हणूनचे नियुक्ती पत्र निकीचा भाऊ दिपेशच्या मोबाईलवर पाठवले. ५ नोव्हेंबर २०१९ रोजी कामावर हजर होण्यास त्यात नमूद होते. त्यामुळे भोईर कुटुंबाने कासारे दाम्पत्यास आणखी ३ लाख दिले.
प्रिती व सागर ह्यांना निकीने मंत्रालयात कोणाला भेटायचे असे विचारले असता साहेब बाहेर कामासाठी असल्याचे सांगितले. निकी ह्याला शंका आल्याने त्याने मंत्रालयात कामाला असणाऱ्या मामा दुर्गेश म्हात्रे याना नियुक्ती पत्र दाखवले असता ते बनावट आहे असे दुर्गेश यांनी सांगितले . त्यामुळे ते सर्व कासारेच्या घरी गेले असता प्रीती व सागर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली व पैसे करत करतो असे आश्वस्त केले. त्यांनी दिलेला ४ लाखांचा धनादेश सुद्धा वटला नाही. दरम्यान कासारे दाम्पत्य मोबाईल बंद करून पळून गेले असल्याने अखेर बुधवार २३ फेब्रुवारी रोजी निकीच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.