लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत बनवेगिरी करणाऱ्या भामट्यांनी वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करून अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. गुरुवारी अजनी, पारडी आणि बजाजनगरात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यापैकी अजनीतील एका व्यक्तीला केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले पद (कमिटी) मिळवून देण्याचे आमिष दाखवून दमण दिव येथील एका आरोपीने चक्क २८ लाख, ५० हजार रुपये उकळले. पारडीत एका ट्रान्सपोर्टरची पावणेदोन लाखांनी फसवणूक करण्यात आली तर बजाजनगरात बंटी बबलीने कोटक महिंद्रा कंपनीला ९ लाख, ६२ हजारांचा चुना लावला.मंत्रालयाच्या कमिटीत नियुक्तीअजनीतील दीपक मारोतराव नागोसे (वय ४५) हे स्कूल संचालक आहेत. त्यांची मंगेश जागेश्वर खडतकर यांच्यासोबत जुनी ओळख आहे. नागोसे अनेक दिवसापासून एखादे चांगले पद मिळविण्याच्या प्रयत्नात होते. खडतकरने दमणदिव येथील हाजी आमिन कुरेशी याच्यासोबत नागोसेंची २०१६ मध्ये ओळख करून दिली. कुरेशीने तामझाम दाखवून नागोसे यांना प्रभावित केले. आपली केंद्र सरकारमध्ये मोठी पोहच असल्याचे सांगून त्याने नागोसेंना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कमिटीत सदस्य म्हणून नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखवले. ही नियुक्ती झाल्यास तुम्हाला राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळेल अन् अनेक अधिकारदेखील मिळतील, असे सांगितले. मात्र, त्यासाठी खर्च करावा लागेल, असे कुरेशी म्हणाला. केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळणार, असे ऐकून नागोसेंनी खर्च करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आरोपी कुरेशीने नागोसे यांच्याकडून १ मे २०१६ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत वेगवेगळ्या पद्धतीने २८ लाख, ५० हजार रुपये घेतले. बदल्यात नागोसेंना बनावट नियुक्तीपत्र मिळाले. त्याची शहानिशा केल्यानंतर ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुरेशीचा फोलपणाही उघड झाला. त्यामुळे नागोसेंनी त्याला आपली रक्कम परत मागितली. तो नुसती टाळाटाळ करीत असल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर अजनी पोलिसांनी आरोपी कुरेशीविरुद्ध गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक दमण दिवला जाणार आहे.पारडीत ट्रान्सपोर्टरला लावला चुनादिघोरी नाक्याजवळच्या साईनगरात राहणारे नरेश मधुकर बोबडे हे ट्रान्सपोर्टर आहेत. त्यांचे सिद्धेश्वर रोड लाईन्स नावाने कार्यालय आहे. त्यांना गोयन कोल डेपो भंडारा रोड येथून लातूरला कोळसा पोहचविण्याचा ऑर्डर मिळाला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या संपर्कातील आरोपी ट्रकमालक व्यंकट कांबळे (रा. बालाजीनगर लातूर) यांना तो कोळसा लातूरच्या कीर्ती उद्योग समूहात पोहचविण्यास सांगितले. त्यानुसार टीएस ०८/ यूएफ ६६६७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २५ टन ३३० किलो कोळसा (किंमत दीड लाख रुपये) आणि डिझेलचा खर्च म्हणून ३२ हजार रुपये बोबडे यांनी कांबळेला दिले. आरोपीने हा कोळसा नमूद ठिकाणी लातूरला न पोहचविता त्याची परस्पर विल्हेवाट लावली. आरोपी कांबळेने पावणेदोन लाखांचा चुना लावल्याचे उघड झाल्यानंतर गुरुवारी बोबडे यांनी पारडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.कोटक महिंद्राला बंटी-बबलीचा गंडाखापरखेड्यातील थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अभियंता असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून बंटी - बबलीने कोटक महिंद्रा फायनान्स कंपनीला ९ लाख, ६२ हजारांचा गंडा घातला. स्वप्निल रामटेके (सावनेर) आणि स्वाती नागेश पवार अशी आरोपींची नावे आहेत.या दोघांनी खापरखेड्यातील थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली. ओळखपत्रही बनविले. स्वातीने स्वत:चे नाव स्वाती नागेश पवार ऐवजी स्वाती नरेश पवार असल्याचे सांगत बनावट पगारपत्रक आणि ओळखपत्र सादर करून १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान कोटक महिंद्रा प्रा. लि. च्या शंकरनगर शाखेतून ९ लाख,६१ हजार, ९७८ रुपयांचे कार लोन घेतले. कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीतर्फे चौकशी करण्यात आली. त्यानंतर आरोपींची बनवाबनवी उजेडात आली. त्यावरून दीपक दत्तात्रय वाकडे (वय ४२, रा. भोलेबाबानगर) यांनी कंपनीतर्फे बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस आरोपींची चौकशी करीत आहेत.