सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ मुख्य मार्केट मधील सियाराम नावाच्या दुकानात ब्रॅण्डेड कपड्याच्या नावाच्या खाली नागरिकांची फसवणुक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून लाखो रुपयांचे कपडे जप्त केले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, मुख्य मार्केट मधील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाच्या समोरील सियाराम नावाच्या एका दुकानात ब्रॅण्डेट सियाराम कंपनीच्या कपड्याची विक्री केली जात होती. अशी माहिती अँटी पायरसी सेलला मिळाली होती. त्या माहितीनुसार अँटी पायरसी सेलने स्थानिक विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी दुकानावर धाड टाकून कारवाई केली. धाडीत पोलिसांनी दुकानातून लाखोंचा ब्रॅण्डेड कपड्याचा साठा जप्त करून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दुकानमालक भीमाशंकर चिंचोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात विविध कंपन्यांचे इलेक्ट्रानिक वस्तू व ब्रॅण्डेट कंपनी वस्तूच्या नक्कलीचे गुन्हे यापूर्वीही झाले आहे.
सियाराम नावाच्या या दुकानातून अनेक राजकीय नेते, प्रतिष्ठित व्यक्ती कपडे खरेदी करीत असल्याचीही चर्चा आहे. या दुकानदाराच्या मालकाने, लबाडीने सियाराम कंपनीचा लोगो वापरून नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस कन्हैया थोरात यांनी दिली. दुकानातून तब्बल साडेतीन लाखांचे सियाराम कंपनीचे लोगो असलेले शर्ट, पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत. या सोबत शूट कव्हर, सियाराम कंपनीचे लोगोदेखील ताब्यात घेण्यात आला. दुकानचालक भीमाशंकर चिंचोळे याच्यावर कॉपीराईट्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानाच्या पहिल्या मजल्यावरच रेडिमेड कपडे तयार करण्याचा कारखाना असून कारखान्यात २० ते २५ टेलर काम करीत असल्याचे धाडी वेळी उघड झाले.