मीरा रोड : एका वधू-वर सूचक मंडळाकडून नाव दिलेल्या इच्छुक वराने भार्इंदरच्या घटस्फोटीत महिलेस लग्नाचे आमिष दाखवून एक लाख रुपयांना गंडवल्याबाबत नवघर पोलिसात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.फसवणूक झालेली घटस्फोटीत महिला ही भार्इंदर पूर्वेला आई, वडील व मुलीसह राहते. तिच्या वडिलांनी लग्नासाठी मुलीचे नाव नोंदवले होते. संस्थेकडून मनिष अग्रवाल या घटस्फोटीत इच्छुक वराचे नाव, फोटो, पत्ता देण्यात आले. अग्रवाल याने आपला दिल्ली व वांद्रे बँडस्टँड येथील पत्ता, दोन भ्रमणध्वनी क्रमांक दिले होते. त्याला नऊ वर्षांची मुलगी असल्याचे नमूद होते. २८ मार्चला महिलेने अग्रवाल याच्या व्हॉट्सअॅपवर स्वत:ची माहिती, फोटो पाठवले असता त्याने लग्नास होकार दिला. अग्रवालने दुसऱ्या क्रमांकावरुन मेसेज करुन आपण दिल्लीला ‘बेटियाँ और आश्रय’ नावाची सामाजिक संस्था चालवत असून त्यास पैसे पाठवण्याचे आवाहन केले. महिलेने अग्रवालच्या खात्यावर एक लाख ८ हजार रुपये जमा केले. त्यानंतर तिने सतत अग्रवाल याला भेटण्याचा प्रयत्न केला असता तो टाळाटाळ करत होता. त्यामुळे ती त्याच्या वांद्रे येथील पत्त्यावर गेली. तेथे चौकशी केली असता रखवालदाराने मनिष अग्रवाल नावाचे कोणीच रहात नसल्याचे सांगितले. आपले पैसे परत करण्यासाठी त्याला संदेश पाठवूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी पैसे भरलेल्या संस्थेची माहिती आपल्या बँकेत जाऊन घेतली असता ते खाते राजस्थानच्या सिक्करमधील लक्ष्मणगडच्या रोरु येथील असल्याचे समजले. सदर खाते हे संस्थेचे नसून जितेंद्रसिंग जिरावरसिंग याच्या नावे होते. त्याचा भ्रमणध्वनी मिळवून त्यावर फोन केला असता अग्रवाल हा आपला मित्र असून आपल्या खात्यात पैसे आले आहेत. व ते आपले असल्याचे सांगून त्याने फोन कट केला. याप्रकरणी त्यांनी पोलिसात मनिष व जिरावरसिंग विरोधात गुन्हा दाखल केला.
घटस्फोटीत महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:40 AM