पुणे : बनावट कागदपत्रे तयार करुन सातारा येथील औंध संस्थानाच्या श्रीमती गायत्रीदेवी भगवतराव पंत प्रतिनिधींची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्या वकिलासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सदाशिव पेठेतील मालमत्तेचे बनावट दस्त ऐवज तयार करुन फसवणूक करण्यात आली़ याप्रकरणी तिघांना अटक केली असून पोटभाडेकरुबरोबर गायत्रीदेवींच्या वकिलानेच संगनमत केल्याचे उघड झाले आहे.
शशी शंकर पोडवाल (वय ५९, रा़ आळंदी रोड, येरवडा), आसिफ जलिल खान (वय ६१, रा़ मार्केटयार्ड), अन्वर युनुस खान पठाण (वय ५४, रा़ गोखलेनगर) अशी अटककेलेल्यांची नावे आहेत. अॅड. कमलेश पिसाळ (रा़ सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गायत्रीदेवींचे स्वीय सहायक बलराज अरुण वाडेकर (वय ३७, रा़ गुरुवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांच्या मालकीच्या सर्व्हे नं़ ४५८/१ टिळक रोड, सदाशिव पेठ या मिळकतीचे शशी पोडवाल याने गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांच्या मालमत्तेतील पोटभाडेकरु आसिफ व अन्वर यांच्याशी संगनमत करुन मालमत्तेचा बनावट नोटराईज समझोता करारनामा केला़ त्यावर गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी व त्यांच्या मुली चारुशिला राजे पंत प्रतिनिधी व हर्षिताराजे पंत प्रतिनिधी यांचे फोटो लावून खोर्टया सह्या केल्या़ हा समझोता करारनामा खोटा आहे हे माहिती असतानाही श्रीमती गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांचे वकिल अॅड. कमलेश पिसाळ यांनी त्या सर्वांशी संगनमत करुन बनावट दस्त ऐवज तयार करुन श्रीमती गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांची फसवणूक केली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, वाडेकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच ते गायत्रीदेवी यांचे स्वीय सहायक म्हणूनही काम पहातात़ त्यांच्याकडे एजंट विजय पारेख हा पोट भाडेकरु आसिफ खानला घेऊन आला होता़ त्याने एक जमीन विकायची असल्याचे सांगत तिची कागदपत्रे दाखविली़ ही कागदपत्रे गायत्रीदेवी यांच्या जमिनीची असल्याचे वाडेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याची खोलात जाऊन चौकशी केली़ तेव्हा एजंटाने त्यांना भोसरी येथील शशी पोडवाल याच्याकडे नेले़ त्याने आपला गायत्रीदेवींबरोबर ३ कोटी ९० लाखांचा जमिनीचा व्यवहार झाल्याचे सांगत तयार केलेली बनावट कागदपत्रे दाखविली़ त्यानंतर वाडेकर यांनी तातडीने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली़. तक्रार केल्यानंतर ते जमिनीच्या व्यवहाराची बोलणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर गेले़ तेथे पोटभाडेकर आसिफ खान याने जागा सोडण्यासाठी मला ८ कोटी आणि अॅड. पिसाळ याला २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.