- सदानंद नाईकउल्हासनगर - बजाज इन्शुरन्स कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पॉलिसीधारक आसन बालानी यांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मिनू पंकज झा, सतिष सोनी व संतोष तोलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर मध्ये राहणारे उधोजक आसन बालानी यांनी मुलगा नीरज यांच्या नावाने बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसी या कंपनीत पॉलिसी काढली होती. पॉलिसाचा प्रिमियम वर्षाला १ लाख रुपये आहे. पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, कंपनीचे मिनू झा, सतीश सोनी व संतोष तोलानी यांनी संगनमत करून पॉलिसीचा मोबाईल नंबर परस्पर रद्द करून संतोष तोलानी यांचा नंबर समाविष्ट केला. तसेच तोलानी हेच नीरज बालानी असल्याचे भासवून विनापरवाना व संमतीविना मूळ पॉलिसी ब्रेक करून पॉलिसीची १२ लाख २५ हजार रुपये इतर दोन पॉलिसी मध्ये वळते केले.
बजाज इन्शुरन्स कंपनीच्या मिनू दास, सतिष सोनी व संतोष तोलानी यांनी संगनमत करून आसन बालानी यांची ४६ लाख ६१ हजार २५२ रुपयांची फसवणूक केली. सदर प्रकार ८ सप्टेंबर २०२० ते १८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला. याप्रकरणी संगणकात बनावट दस्तऐवज बनविण्यात आल्याचे उघड झाले. बजाज इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आपली फसवणूक झाल्याचा प्रकार आसन बालानी यांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी बालानी यांच्या तक्रारीवरून मिनू झा, सतिष सोनी व संतोष तोलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.