नालासोपारा (मंगेश कराळे) :- स्वस्त दरात फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश आले आहे. या अटकेने ५ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वसई विरार परिसरात स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची जाहिरात करणारे रॅकेट सक्रिय आहे. त्याआधारे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ मार्च ते जून २०२१ या कालावधीत रामसिंग देवरा, शुभम मिश्रा, सूरज दुबे, गौतम चौधरी आणि रूम मालक पुलक दास यांनी मिळून तक्रारदार हरेल पंट्रिक साळवीन (६९) यांच्याकडून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली १७ लाख रुपये घेतले. बराच वेळ होऊनही तक्रारदाराला हक्काचे घर न मिळाल्याने त्यांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तक्रार आल्यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा तीनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोंदवलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नोंदवलेल्या समांतर गुन्ह्याचे विश्लेषण करताना मिळालेली गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रामसिंग जालमसिंग देवरा (२८) याला २ फेब्रुवारीला अटक केली. आरोपी सध्या नालासोपारापोलिसांच्या कोठडीत आहे. स्वस्त दरात घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची हेरगिरी करण्याचा कट त्याने त्याच्या इतर साथीदारांसह रचल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून अशा अनेकांना या आरोपीने ५० लाख रुपयांची फसवणूक केली होती. पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने ही कारवाई केली.