ठाणे : नाशिक येथे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स मार्फत ऑनलाईन टॅक्सी बुक करणाऱ्या श्रीकांत दिलीप आहिरराव (३६, रा. ठाणे) यांना तब्बल दोन लाख २३ हजार ९२० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.
नौपाडा भागात राहणारे अहिरराव यांना नाशिक येथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी १८ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ९ ते १९ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या दरम्यान महाराजा ट्रॅव्हर्ल्सच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन टॅक्सी बुकींग करीत होते. त्याचवेळी त्यांना एका भामटयाने मोबाईलवरुन संपर्क साधला. या संकेतस्थळावर शंभर रुपये वळते करण्यास त्यांना सांगितले. परंतू, ते पैसे वळते झाले नाही. त्यांनतर या भामटयाने अहिरराव यांच्या सिटी बँक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडीट कार्ड खात्यातून दोन लाख २३ हजार ९२० रुपये परस्पर काढून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे कालांतराने लक्षात आल्यानंतर या प्रकाराबाबत अहिरराव अज्ञात आरोपी विरुध्द फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ५ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक मोरे हे करत आहेत.