लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन ओव्हरसिज बँकेच्या हुडकेश्वर शाखेत बनावट कागदपत्रांद्वारे गृहकर्ज प्रकरण सादर करून आरोपींनी बँकेला सव्वा कोटीचा चुना लावला. ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू झालेल्या या फसवणुकीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गुरुवारी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे बँकिंग वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.विनय सुरेश बुरले (वय ३४, रा. न्यू गाडगेबाबा नगर, खरबी), सुशांत अरुणराव जुमडे (वय २८, रा. अंबानगर सिद्धेश्वरनगरजवळ, दिघोरी) नितेश नानाजी वरके (वय ४५, रा. रामकृष्ण नगर, दिघोरी), राकेश शंकर राऊत (वय ३२, रा. रामकृष्णनगर, दिघोरी), दिलीप सीताराम पाटील (वय ४४, रामकृष्ण नगर, दिघोरी) आणि नितीन भाऊराव साबळे (वय ३८, रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांनी या कर्ज घोटाळ्यात आणखी ५ जणांची नावे घेतली असून, त्यांची नावे मात्र पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही.उपरोक्त ११ आरोपींनी ११ ऑगस्टला शुभ गृह कर्ज योजनेंतर्गत इंडियन ओव्हरसिज बँकेच्या हुडकेश्वर शाखेत गृहकर्जांचे प्रकरण सादर केले. त्यातून १ कोटी, ५२ लाख, ३०० रुपयांचे कर्ज उचलले. ही रक्कम आरोपींनी लाटल्यानंतर लगेच बँकेला संशय येऊ नये म्हणून कर्जाचे काही हप्ते भरले. दीड कोटींपैकी २५ लाख रुपये जमा केल्यानंतर सर्व आरोपींचे खाते एनपीए झाले. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठांनी चौकशी सुरू केली. त्यात आरोपींनी बनावट कागदपत्रेच नव्हे तर शासकीय कामासाठी वापरले जाणारे रबरी शिक्के तयार करून त्याचा गैरवापर केल्याचे उघड झाले. आरोपींनी बँकेला एकूण १ कोटी, २४ लाख, ५४, ५८९ रुपयांचा चुना लावल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बँक व्यवस्थापक चंदनकुमार विनोदानंद झा (वय ३३) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. प्रकरण मोठ्या रकमेचे असल्याने त्याची चौकशी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे गेली. या पथकाने प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गुरुवारी ११ आरोपींविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यातील उपरोक्त सहा आरोपींना अटक केली.ते पाच आरोपी कोण ?प्रदीर्घ चौकशी करून ११ पैकी ६ आरोपींना अटक करणाऱ्या पोलिसांनी पाच आरोपींची नावे स्पष्ट केली नाही. त्यामुळे ते पाच आरोपी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपींना मदत करणारांमध्ये बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का, अशीही विचारणा केली जात आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना शुक्रवारी १३ मार्चला न्यायालयात हजर करून त्यांच्या पीसीआरची मागणी केली जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम गौड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.