लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुबईची सफर घडवून आणण्याच्या नावाखाली दोन आरोपींनी १४ जणांची फसवणूक केली. अजय राठोड आणि अभिषेक फसिन अशी आरोपींची नावे आहेत. तहसील पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गांधीबागमधील कापड व्यापारी हितेश गिरीश राजकोटिया (वय ३७) स्वामीनारायण मंदिराजवळ राहतात. १५ जानेवारी २०१९ ला त्यांचे मित्र भाविक पुराणिक त्यांच्याकडे आले होते. त्यांनी विदेशी सफरीवर जाण्यासाठी मोबाईलवर पर्याय बघितले. ट्रीप झोलो टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या पेजवर त्यांनी माहिती बघितल्यानंतर तेथे नमूद मोबाईलवर संपर्क केला. आरोपी अजय राठोड याने दुबईच्या सफरीची माहिती देऊन प्रति व्यक्ती ५५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे हितेश आणि भाविकने नंतर राठोडसोबत सविस्तर चर्चा करून राठोड तसेच फसिनच्या बँक खात्यात २ लाख १० हजार रुपये जमा केले. भाविकने सांगितल्याप्रमाणे आरोपी राठोडने त्यांना नंतर नागपूर ते शारजाह १४ लोकांच्या अरेबिया एअरलाईन्सच्या विमानाचे तिकीट पाठविले. जेव्हा दुबईला जायची वेळ आली तेव्हा आरोपींनी हितेश आणि भाविकला कॅन्सल केलेले तिकीट पाठविल्याचे उघड झाले. १५ जानेवारी ते २९ ऑक्टोबर या कालावधीत हा गैरप्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे हितेश आणि भाविक यांनी आरोपी राठोड तसेच फसिनसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी हितेशने तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रविवारी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.दिल्ली, नोएडाचा पत्ताआरोपी राठोड आणि फसिन यांनी नोएडा, दिल्ली येथे आपले ऑफिस असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची तेथील सूत्रांकडून माहिती घेतली असता असे कोणते कार्यालय आरोपींनी दिलेल्या पत्त्यावर नसल्याचे समजते. त्यामुळे ऑफिसच नव्हे तर त्यांची नावेसुद्धा खरी आहेत का, त्याबाबत संशय आहे. तहसील पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.