पुणे : उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेचा पास काढून देतो, असे सांगून काही लोकांकडून प्रत्येकी १ हजार रुपये घेऊन फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा विठ्ठल मंदारे (रा. कामधेनू इस्टेट, हडपसर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी राजेशकुमार शामाचरण गौतम (वय ४०, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार गौतम मुळचे उत्तर प्रदेशातील भादोही जिल्ह्यातील राहणारे आहेत. हडपसर भागात ते पान टपरी चालवितात. पण लॉकडाऊनमुळे त्यांची पान टपरी गेली २ महिने बंद आहे. रेल्वेतून परप्रांतियांना त्यांच्या गावी घेऊन जाण्याची सुविधा निर्माण केल्याचे त्यांना माहिती झाले. त्याचवेळी पुष्पा मंदारे यांनी त्यांना व इतरांना तुमचे रेल्वेने जाण्याचे फॉर्म भरुन देते व तुमचा पास काढून देते, असे सांगितले. त्यासाठी त्यांना हडपसर येथील गाडीतळ पुलाखाली २२ मे रोजी बोलावले होते. या कामासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर गौतम व इतरांनी त्यांच्याकडे वारंवार विचारणा केली तर तेव्हा त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यांनी चौकशी केल्यावर उत्तर प्रदेशसाठी अनेक रेल्वेगाड्या पुण्यातून गेल्या तरी त्यांचा पास काढून दिला नाही. आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आतापर्यंत किमान ५ जणांची अशाप्रकारे फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुक झालेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे रोजगार बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात गरीब लोकांसाठी १ हजार रुपयेही मोठी रक्कम होते. अडचणीत असलेल्यांना वेठीस धरुन फसवणुकीच्या या प्रकारात रक्कम कमी असली तरी पोलिसांनी त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.