लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओएलएक्स अॅपवर ऑनलाईन बाईकची विक्री करायची आहे, अशी बतावणी करून युवकाची ३६ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. यात युवकाचे पैसेही गेले आणि बाईकही मिळाली नसल्यामुळे युवकाने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.आनंद धनराज मलवे (२१) रा. स्मृतिनगर, कोराडी असे फिर्यादी युवकाचे नाव आहे. आनंदने १७ ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता ओएलएक्स अॅपवर एक बाईक पसंत केली. अॅपवर दिलेल्या बाईकच्या मालकाचा मोबाईल क्रमांक ९३५२१०९२२६ वर त्याने संपर्क साधला. आरोपी बाईक मालकाने आनंदला १८ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता विमानतळावर बोलावले. तेथे गेल्यावर आनंदने आरोपीला मोबाईलवर संपर्क साधला. त्यावर आरोपीने मी विमानतळावर डिलिव्हरी करीत असून बाईक घेण्यासाठी आपल्या खात्यात ५ हजार रुपये टाकून एटीएमचा फोटो व्हॉट्सअप करण्यास सांगितले. त्यावर आनंदने आरोपीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर एटीएमचा फोटो पाठविला. काही वेळानंतर आनंदच्या वडिलांच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक आला. दरम्यान आरोपीने आनंदला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा क्रमांक मागितला. ओटीपी क्रमांक देताच आनंदच्या खात्यातून ४७ हजार रुपयांची रक्कम कमी झाली. खात्यातून पैसे जाताच आनंदला आरोपीवर संशय आलाल. त्याने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. सायबर सेलमध्ये तक्रार करताच आनंदच्या खात्यात ११ हजार १६५ रुपये परत आले. यात आनंदला बाईकही मिळाली नाही आणि आरोपीने त्याचे ३५ हजार ८३५ रुपये घेतले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.
नागपुरात ऑनलाईन बाईक विक्रीच्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 7:31 PM