नवी दिल्ली - बॉबी कटारिया...पूर्ण नाव बलवंत कटारिया, प्रसिद्ध युट्यूबर, कधी तो समाजसेवक म्हणून कोरोना काळात लोकांची मदत करताना दिसतो, तर कधी सेलिब्रिटी बनून लोकांच्या गराड्यात दिसतो. सोशल मीडियावर त्याचा बरेच फॅन फोलोअर्स आहेत. परंतु हा बॉबी कटारिया अन्य कारणामुळे चर्चेत आहे. परदेशात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोमवारी पोलीस आणि एनआयएनं त्याला अटक केली.
हरियाणातील गुरुग्राम येथे राहणारा बॉबी कटारिया श्रीमंत कुटुंबातून पुढे आला. सुरुवातीला बॉडी बिल्डिंग हा त्याचा छंद होता. तो सतत जिममध्ये वर्क आऊट करताना व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करायचा. त्याच्या व्हिडिओतून तो फिटनेस आणि न्यूट्रीशनबाबत टिप्स द्यायचा. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ३ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहे. अनेकदा त्याचे व्हिडिओ वादातही अडकले आहेत.
बॉबी कटारियाकडे किती संपत्ती?
बॉबी कटारियानं २०१९ मध्ये फरिदाबाद लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याला अवघे ३९३ मते मिळाली. ५ वर्षापूर्वी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने १२ लाख संपत्ती असल्याचं सांगितले होते. परंतु अलीकडच्या मिडिया रिपोर्टनुसार, बॉबी कटारियाकडे जवळपास ४१ कोटी संपत्ती असून तो कोट्यवधीचा मालक असल्याचं पुढे आलं. त्याच्याकडे गुरुग्राममध्ये लग्झरी कारसह अलिशान घरही आहे. त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा युट्यूबमधून मिळतो.
बॉबीला अटक का?
नुकतेच उत्तर प्रदेशातील २ युवक अरुण कुमार आणि मनिष तोमर यांना युएई आणि सिंगापूर येथे नोकरीला लावण्याचं आमिष बॉबी कटारियाने दिले. त्या बदल्याने बॉबीनं ४ लाख रुपये मागणी केली. अरुण आणि मनिषला फसवून लाओसला नेले त्याठिकाणी दोघांचे पासपोर्ट हिसकावून घेतले. त्यानंतर दोघांना बेकायदेशीरपणे चालणाऱ्या एका कॉल सेंटरमध्ये काम करावं लागलं. २ दिवस काम केल्यानंतर तिसऱ्या दिवशी संधी मिळताच हे दोघे युवक फरार झाले. त्यानंतर भारतीय दूतावासाची संपर्क साधून ते भारतात परतले. याठिकाणी येताच त्यांनी बॉबी कटारियाविरोधात पोलीस ठाणे गाठले, तिथे बॉबीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
१५० भारतीयांची फसवणूक
सोमवारी एनआयए आणि गुरुग्राम पोलिसांच्या टीमनं बॉबी कटारिया यांना घरातून अटक केली. यावेळी धाडीत त्याच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. तपासात बॉबी कटारियाने मानवी तस्करीच्या माध्यमातून १५० भारतीयांची फसवणूक केल्याचं उघड झालं.
११ वकिलांची फौज उभी केली अन्...
दरम्यान, २०२२ मध्ये रस्त्यावर बसून दारू प्यायल्याने बॉबी कटारिया चर्चेत आला होता. देहारादूनच्या रस्त्यात मध्येच खुर्ची टाकून बसून त्याने दारू प्यायली. ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यात उत्तराखंड पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यावेळी दिल्लीहून ११ वकिलांची फौज बॉबीच्या सुटकेसाठी उत्तराखंड येथील कोर्टात पोहचली. या प्रकरणी बॉबी कटारियाला जामीन मिळाला.