अंबरनाथः अंबरनाथ पूर्वेतील कर्जत राज्यमार्गावर अंबरनाथ पेट्रोल पंप ते सुदामा हा भागात पोलीस असण्याची बतावणी करून चार भामट्यांनी एका 56 वर्षीय व्यक्तीला 2 लाख 55 हजार रूपयांना लुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही काळात एमआयडीसी परिसरात लुटमारीच्या वाढत्या घटनांमुळे येथील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच रस्त्यावर याआधी तीन पेक्षा जास्त अशाच पद्धतीच्या लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या तोतया पोलिसांना पकडण्यात खऱ्या पोलिसांना अजूनही अपयश आले आहे.
अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीतील असुरक्षितता गेल्या काही काळात वाढत चालली आहे. काटई- कर्जत महामार्गावर अंबरनाथ हद्दीत काही चोरटे पोलीस असल्याची बतावणी करून सर्वसामान्य कामगार आणि सर्व सामान्य नागरिकांना लुटून त्यांची फसवणूक करत आहे. वसंत सरगर (56) हे आनंद नगर औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त जात असताना गुरूवारी रात्री आठच्या सुमारास काटई कर्जत राज्यमार्गावर औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारापूर्वी रस्त्यावर चार इसमांनी त्यांना अडवले. आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांनी सरगर यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 55 हजार रूपयांचा ऐवज काढून घेत लबाडीने पळवले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सरगर यांनी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून चार अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारची फसवणूक करणारे अनेक प्रकार याच रस्त्यावर घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या रस्त्यावर गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे