लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या ५९ वर्षीय डायना क्रास्टो ह्या महिलेने कुरियर कुठं पर्यंत पोहचले हे पाहण्यासाठी गुगल वर सर्च केले. सायबर लुटारूंनी २ रुपये भरण्यास सांगून त्यांची ९५ हजारांना ऑनलाईन फसवणूक केली .
कुरियर कुठं पर्यंत आले हे पाहण्यासाठी डायना यांनी गुगलवर सर्च केले . त्यावेळी कस्टमर केअर.क्लिक / कुरियर सर्व्हिस ह्यावर लॉगिन केले आणि कुरियर आयडी टाकला . थोड्यावेळाने एका भ्रमणध्वनी वरून कॉल आला . त्याने दुसऱ्या क्रमांक वरून लिंक पाठवून त्यावर गुगल पे द्वारे २ रुपये भरा , तुम्हाला कुरियर बॉयचा नंबर देतो असे सांगितले . डायना यांनी २ रुपये भरले असता काही वेळाने सुरजकुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने कॉल करून तुमचे कुरियर ४ वाजे पर्यंत देतो असे सांगितले .
परंतु सायंकाळी डायना यांच्या बँक खात्यातून कोणताही ओटीपी न येताच चार वेळा थोडे थोडे करून ९५ हजार रुपये काढले गेले . तक्रारी नंतर सायबर शाखेने चौकशी केली . डायना यांच्या फिर्यादी वरून नया नगर पोलिसांनी अनोळखी ३ मोबाईल धारकांवर ४ जुलैच्या सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे .