लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - इंस्टाग्राम वर अनोळखी व्यक्तीने बिटकॉइन मध्ये चांगला फायदा करून देण्याचे आमिष दाखवून भाईंदरच्या व्यक्तीस सव्वा पाच लाखांना ऑनलाईन गंडवल्याची घटना घडली आहे.
उत्तन भागात राहणार ललीत रमेश चव्हाण (३५ ) यांना त्यांच्या इंस्टाग्राम वर स्वतःला अमेरिकेत रहात असल्याचे सांगणाऱ्या वेनडी नावाच्या अनोळखी व्यक्तीने संदेश पाठवला . बिटकॉइन मध्ये ४० हजार भरले कि ३ लाख ९० मिळतील असे आमिष दाखवले.
ललित यांनी पैश्यांच्या लोभाने त्या अनोळखी व्यक्ती सोबत चॅटिंग सुरु केले . ट्रेडिंग खाते उघडून त्यात ४० हजार भरले . सुरवातीला खात्यात ४ लाख ९ हजार दिसले मात्र ते काढण्याचा प्रयत्न करून देखील शक्य झाले नाही . पैसे काढण्यासाठी संकेतस्थळावर ट्रेडींग खाते रजिस्टर तसेच अपग्रेड करण्यासाठी ललित यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर ५ लाख २० हजार रुपये भरले . मात्र त्या नंतर सुद्धा फायद्याचे सांगितलेले तर सोडाच गुंतवलेले पैसे देखील परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे ललित यांना लक्षात आले . त्यांच्या फिर्यादी वरून उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.