कोल्हापूर : काजूच्या फॅक्टरीसाठी परवाना काढून देण्याचे व बहिणीच्या जावयाला जेलमधून सोडविण्याचे आमिष दाखवून सुमारे ६६ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत शकुंतला चंद्रकांत शिंदे (६५, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.नीता अनिल पारकर, अनिल अर्जुन पारकर, सुहास आंबरे, पूजा राऊत (सर्व रा. रेवदांडा, ता. अलिबाग, जि. रायगड). यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.शिंदे डिसेंबर २०१९ मध्ये एसटी बसने मुंबईला जात असताना नीता पारकर यांची ओळख झाली. शिंदे यांना काजूची फॅक्टरीसाठी परवाने काढून देण्याचे व त्यांच्या बहिणीच्या जावयास जेलमधून सोडविण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून धनादेश, तसेच त्यांचा गाडीवरील चालक सुहास आंबरे यांनी त्यांच्या घरात जाऊन रोखीने पैसे घेतले. पारकर हिने शिंदे यांचे १७ तोळे दागिने बॅंकेच्या लॉकरमधून काढण्यास भाग पाडले. तसेच ते दागिने घेऊन पारकर हिने त्याचे पैसे चालक आंबरे, पती अनिल पारकर, पूजा राऊत यांच्या बॅंक खात्यावर ट्रान्सफर केले. याशिवाय दिलीप पांडुरंग सूर्यवंशी यांच्याकडून ५९ लाख ९४ हजार ३१४ रुपये तसेच शिंदे यांचे ६ ला३ ८० हजार रुपये किमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिने असे सुमारे ६६ लाख ७४ हजार ३१४ रुपयांची फसवणूक केली.
परवान्याच्या आमिषाने गंडा; काेल्हापूरमधील घटना; अलिबागच्या चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 8:21 AM