पिंपरी : व्यवसायासाठी मालमत्तेवर तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तीन जणांनी मिळून तरूणाची तीन लाखाची फसवणूक केली. ही घटना बावधन येथे १० फेब्रुवारी ते १२ ऑगस्ट या कालावधीत घडली. मकरंद शिवाजी ऐवळे (वय २९, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन वसंतराव काळे (रा. लातूर), रवीकुमार आदा (रा. हैद्राबाद), बालाप्रसाद वसंतराव काळे (रा. लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकरंद यांना व्यवसाय करायचा आहे. व्यवसायाकरिता भांडवल उभारण्यासाठी त्यांनी त्यांच्या मालमत्तेवर कर्ज घेण्याचे ठरवले. आरोपींनी मकरंद यांच्या मालमत्तेवर तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवले. मकरंद यांच्याकडून कागदपत्रे घेतली. कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून तीन लाख रुपये घेतले. पैसे घेऊन कर्ज मंजूर केले नाही. दिलेल्या पैशांचा आरोपींनी अपहार केला. आरोपी बाळाप्रसाद याने मकरंद यांच्या वडिलांना फोन करून ह्यया प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, माझे नाव घेतले तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तीन कोटी कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 3:53 PM