नवीन पनवेल : दिल्ली एअरपोर्टवर कस्टम अधिकारी यांनी पकडले असल्याचा बनाव करून, दोघांनी महिलेची १४ लाख दोन हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. आरोपी आनंद कबीर आणि त्याची महिला साथीदार या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोडपाली, कळंबोली सेक्टर २० येथे राहणाऱ्या सीमा बावा यांनी मार्च, २०२० मध्ये जीवनसाथी डॉट कॉमवर अकाउंट उघडले होते. तेव्हा त्यांची भेट कबीर आनंदशी झाली. ३० सप्टेंबर रोजी आनंद कबीरने तो दिल्ली एअरपोर्टला आला असून, त्यांच्यासोबत एक कोटी युरो सोबत आणल्याचे सीमा यांना सांगितले, तसेच त्याला दिल्ली एअरपोर्टवर कस्टम ऑफिसरांनी एक करोड युरो इतक्या रकमेसह पकडले असून, टॅक्स भरण्यासाठी सांगत असल्याचे सांगितले. यावेळी महिला कस्टम ऑफिसरने त्यांना सोडविण्याकरिता व टॅक्स भरण्याकरिता पैशांची मागणी केली. सीमा बावा यांनी त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठविले. यावेळी महिला कस्टम अधिकारी सतत वेगवेगळ्या मोबाइल फोनवरून सीमा यांच्याशी संपर्क करून टॅक्स, फी आणि कस्टम ड्युटी भरण्यास सांगत होती. सीमा बावा यांनी १४ लाख २ हजार ७०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. एवढे पैसे पाठवूनही ते अजून सीमा बावा यांच्याकडे पैशाची मागणी करत असल्याने त्यांना त्यांचा संशय आला. त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात आनंद कबीर व त्याची महिला साथीदार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जीवनसाथी डॉट कॉमवरून घातली लग्नाची मागणीसीमा बावा यांना कबीर आनंद यांनी ते स्पेन येथे राहण्यास असून, युनिसेफ या ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले, तसेच व्हाॅट्सअपवर त्यांनी फोटो पाठवून त्याच्या आई-वडिलांची ओळख करून दिली आणि सीमा यांना लग्नाबाबत विचारले व तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मग दिल्लीला आलो आहोत असे सांगत कस्टम ऑफिसर महिलेच्या नावाने पैसे उकळून कस्टम ड्युटी भरण्यास सांगितले.