पुणे - मुंबईत भाड्याने फ्लॅट मिळवून देतो, असे सांगून डिपॉझिट व अॅडव्हान्स भाडेपोटी पैसे घेऊन फ्लॅट मिळवून न देता ३ लाख ५५ हजाररुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब विठ्ठलराव तिडके (वय ४६, रा़ कोपरी कॉलनी, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे़ यावरुन सायबर पोलिसांनी मनोज ऊर्फ अभिजित मोहन शिनगार (रा़ बाणेर), नेहा कुलकर्णी (इंस्टा ग्राम अकाऊंट धारक) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके यांना आरोपींनी जानेवारी २०२० मध्ये मुंबईत फ्लॅट भाड्याने देतो, असे सांगून त्यांसाठी डिपॉझिट व अॅडव्हान्स घरभाडे देण्यास सांगितले. नेहा कुलकर्णी या नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकांऊटवरुन ही मुलगी आहे, असे भासवून त्याने फिर्यादीशी संवाद साधला़ त्यांना वेगवेगळ्या कारणासाठीबँक खात्यात अगोदर १ लाख ५ हजार रुपये व नंतर अडीच लाख रुपये रोख देण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्यांना भाड्याने फ्लॅट दिला नाही़ तसेच दिलेली रक्कम परत न करता ३ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली़ सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक वाघचवरे अधिक तपास करीत आहेत.
मुंबईत भाड्याने फ्लॅट देण्याच्या नावाने साडेतीन लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 2:58 PM