लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपत्तीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या संचालकाची ५ कोटी ५५ लाखाने फसवणूक करण्यात आली. सीताबर्डी पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरसह आठ लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जाहिद मिर्झा बेग राय न्यू कॉलनी, गौतम सिंह रा. जाफरनगर, बंटी शेलेंद्र शॉ, प्रशांत सतराळकर, रा. व्हीसीए स्टेडियमजवळ सदर, आशिष जैन, सुजित कुमार, नईम खान आणि वाकेकर परिवार अशी आरोपीची नावे आहे तर सुशील कोल्हे (२९) रा. वांजरा असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.कोल्हे यांची सिव्हील लाईन्स येथे एजीएम कॉर्पोरेशन नावाची डिजिटल अॅडव्हर्टायजिंग कंपनी आहे. बेग आणि सिंह प्रॉपर्टी डीलर आहेत. आरोपींनी व्हीसीए स्टेडियम समोरील चर्चची, जरीपटका स्मशानभूमीच्या जवळची आणि वाकेकर परिवाराच्या शताब्दीनगर चौकातील जमीन दाखवली. कोल्हे यांना कमी किमतीत ही जमीन विकायची असल्याचे सांगितले. भविष्यात या जमिनीची किमत कितीतरी अधिक असल्याचे आमिष दाखविले. बोगस दस्तावेज दाखवून तिन्ही जमिनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. आरोपींच्या आमिषाला बळी बडून कोल्हे यांनी २०१८ मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने दोन वर्षात ५ कोटी ५५ लाख रुपये आरोपींना दिले. यानंतर कोल्हे ती जमीन आपल्या नावावर करण्याची मागणी केली. परंतु आरोपी टाळाटाळ करू लागले. गेल्या सहा महिन्यापासून कोल्हे आपले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत होते. परंतु आरोपी पैसे देण्यास सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने कोल्हे प्रचंड तणावात आले. त्यांच्यावर मोठे कर्ज झाले. त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळ्यांचे सेवन केले. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या आधारावर सीताबर्डी पोलिसांनी तपास सुरु केला. कोल्हे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती होताच आरोपी भूमिगत झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. फसवणुकीची रक्कम अधिक असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.
प्रॉपर्टी गुंतवणुकीच्या नावावर साडे पाच कोटीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:40 PM
संपत्तीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या संचालकाची ५ कोटी ५५ लाखाने फसवणूक करण्यात आली. सीताबर्डी पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरसह आठ लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देपीडिताने तणावात घेतल्या गोळ्या : सीताबर्डीत गुन्हा दाखल