सदानंद नाईक
उल्हासनगर : बालाजी डेव्हलपर्स संस्थेच्या पाच भागीदारांनी बांधकाम प्रकल्पातील भागीदार करारनाम्याचा भंग करून दोघा भावाची तब्बल आठ कोटी ७६ लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा रिंकू जेसवानी यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून बांधकाम प्रकल्प वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली.
उल्हासनगर शेजारील म्हारळगाव तसेच कल्याण येथील पिसवली, नांदवली गाव हद्दीत बालाजी डेव्हलपर्स संस्थेने गृहसंकुल उभारण्यात आले असून म्हारळगाव येथील बांधकाम गृहसंकुल फर्म मध्ये ७५ टक्के भागीदार असलेले शंकरलाल सोनी, कैलास सोनी, भवरीदेवी सोनी, कविता सोनी व दिनेश सोनी यांनी २५ टक्के भागीदारीचा करार रिंकू जेसवानी यांच्या सोबत केला. सन २०१३ ते २०२० साला दरम्यान जेसवानी यांच्या वाट्याला येणारा २५ टक्के नफा एकून २ कोटी २६ लाख ५७७ रुपयांची अफरातफर करून आर्थिक फसवणूक पाचही भागीदारांनी केली. तसेच रिंकू जेसवानी यांचे भाऊ नवीन जेसवानी यांना पिसवली, नांदीवली व कल्याण येथील बांधकाम प्रकल्पात कैलास सोनी यांनी ५० टक्के भाकीदारी करारनामा करून ५० टक्के नफ्यातील ६ कोटी ५२ लाख ५२१ रुपयाची अफरातफर करून फसवणूक केली.
अशी जेसवानी बंधूंची एकून ८ कोटी ७८ लाख ९८ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. बालाजी डेव्हलपर्स फर्म मधील म्हारळ गाव हद्दीतील गृहसंकुला मधील २५ टक्के भागीदार असलेल्या रिंकू जेसवानी यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, ५ जणा विरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक चौकशी करीत असून गृहसंकुल वादात सापडले आहे.