लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वस्त दरात भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा घालणाºया पश्चिम उपनगरातील शिवसेनेच्या एका उत्तर भारतीय पदाधिकाºयासह चौघांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम दुबे उर्फ पहोडी असे त्याचे नाव असून हरिशंकर वैश्य, अब्बास गफूर सय्यद व विजय केशव यादव अशी अन्य तिघांची नावे आहेत.
दुबे व त्याच्या सहकाऱ्यांनी एका वृद्ध दाम्पत्याला ठाण्यातील मुरबाडमध्ये चार गुंठे जमीन देण्याच्या आमिषाने एक लाख २३ हजार रुपये उकळले आहेत. त्यांच्याकडून आणखी नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता पोलीस अधिकाºयांकडून वर्तविण्यात आली. संबंधितांनी तक्रारीसाठी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दुबे हा पश्चिम उपनगरात शिवसेनेच्या उत्तर भारतीय शाखेचा पदाधिकारी आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवमंदिराच्या नूतनीकरण केलेल्या शिवमंदिराचे उद्घाटन करीत त्याने शक्तिप्रदर्शन केले होते.
कुर्ला (प.) येथील काजूपाडा परिसरात राहात असलेल्या बरेंद्र नाथ (वय ७२) यांना दुबे व त्याच्या साथीदारांनी २००९ मध्ये मुरबाड येथे ६३ हजार रुपये प्रति गुंठा जमीन देण्याचे आमिष दाखविले. त्यांनी स्वत:च्या व पत्नीच्या नावे चार गुंठे जमिनीसाठी १ लाख २३ हजार रुपये पवई येथे रत्ना सिद्धी डेव्हलपर्स नावाने काढलेल्या कार्यालयात जाऊन दिले. मात्र त्यानंतर जमीन नावावर करून देण्यास ते टाळाटाळ करू लागले. व्यवहार रद्द करून पैसे परत देण्याची मागणी केली असता चौघांनी त्याला नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांकडील तक्रार मागे घेण्यासाठी दुबे हा धमकावित होता, मात्र नाथ दाम्पत्य ठाम राहिल्याने अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.