मुंबई - शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करून सुमारे दहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना परळच्या केईएम रुग्णालयात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीसांनी पळून गेलेल्या भामट्याविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजित सोनू शिंदे हे वांद्रे येथील खेरवाडी, शिवसागर सहकारी सोसायटीमध्ये राहतात. सध्या ते परळच्या केईएम रुग्णालयातील रक्त पेढीत कामाला आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपी हा काही कामानिमित्त केईएम रुग्णालयात आला होता. यावेळी झालेल्या भेटीत त्याने अजित शिंदे यांना शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होणार असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. इतकेच नव्हे तर शेअर्समध्ये तो त्यांची रक्कम कशाप्रकारे दुप्पट करून देईल याची माहिती दिली होती.
या आमिषाला बळी पडून अजित शिंदे यांच्यासह त्यांच्या परिचित मित्रांसह नातेवाईकांनी त्याच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम कॅश तसेच धनादेशद्वारे देण्यात आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर व्याजदर तसेच जमा केलेल्या रक्कमेचा तपशील दिला नाही. शिंदेसह इतरांनी दिलेल्या दहा लाख रुपयांचा त्याने परस्पर अपहार करुन त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. आतापर्यंत आरोपीने किती लोकांची फसवणुक केली आहे याची माहिती काढली जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी सांगितले.