मुंबई : पेटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड केवायसी पाठोपाठ आता सिम् ाकार्ड केवायसी करण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. गावदेवी येथील सुरक्षारक्षकाला याचा फटका बसला असून, ठगांनी त्यांच्या खात्यातील ५० हजार रूपयांवर डल्ला मारला.कांदिवलीत राहणारे सुरक्षारक्षक लोकनाथ गौरीशंकर सिंग (५०) हे गावदेवी परिसरात काम करतात. १० सप्टेंबर रोजी कामावर असताना त्यांना जिओ कंपनीचा ग्राहक सेवा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून एकाने कॉल केला. सिमकार्ड केवायसी न केल्यास कार्ड बंद होण्याची भीती घातली. त्यांनी घाबरून ठगाने सांगितल्याप्रमाणे आधी आधारकार्ड, नंतर डेबिट कार्डची माहिती शेअर केली. त्यानंतर मोबाइलवर केवायसीचा अर्ज येईल असे सांगून ठगाने लिंक पाठवली. संबंधित लिंकमध्ये माहिती शेअर करताच त्यांच्या खात्यातून ४९ हजार ४५३ रुपये काढण्यात आले.त्यानंतर वारंवार कॉल करूनही संबंधिताने प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने तो नंबर बंद झाला. अखेर सिंग यांनी या प्रकरणी रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलीस तपास सुरूआहे.
सिम कार्ड केवायसीच्या नावाखाली फसवणूक; सुरक्षारक्षकाच्या खात्यातून काढले ५० हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 6:08 AM