पिंपरी : सोन्याची बिस्किटे असल्याचे भासवून आरोपींनी सोन्याच्या बिस्किटांच्या बदल्यात एका पादचारी महिलेकडील ३२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेतले. मात्र, नकली बिस्कीटे असल्याचे समोर आले. हा प्रकार गुरुवारी निगडीतील प्राधिकरण रोडवरील सावली हॉटेल येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
गंगुबाई चंनबसय्या स्वामी (वय ४५, रा. दत्तवाडी, सरस्वती शाळेजवळ, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनोळखी तीन व्यक्तींवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्राधिकरण रोडने गंगुबाई स्वामी या पायी जात असताना अनोळखी तीन व्यक्ती पाठीमागून त्यांच्याजवळ आल्या. त्यांच्याजवळील एका लाल रंगाच्या कापडामध्ये दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्कीट असल्याचे स्वामी यांना सांगितले. ही बिस्कीटे तुम्हाला घेवून तुमच्याकडील सोन्याचे दागिने आम्हाला द्या, असे तिघेजण गंगुबाई स्वामी यांना म्हणाले. त्यानुसार स्वामी यांनी त्यांच्याकडील मंगळसूत्र आणि कर्णफुले अशी ३२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने त्या अनोळखी व्यक्तींकडे दिले. त्यानंतर काही अंतरावर जावून पाहिले असता सोन्याची बिस्किटे नकली असल्याचे समोर आले. यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.