मीरा रोड - घरचा सोफा विक्रीसाठी ऑनलाइन संकेतस्थळावर टाकला असता सोफा खरेदीच्या बहाण्याने कॉल करून एका भामट्याने भाईंदरच्या तरुणास ६३ हजार ५०० रुपयांना गंडा घातला आहे. नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस तपास करत आहेत.
भाईंदर पूर्वेला राहणारा प्रसाद सातोस्कर हा तरुण महापालिकेत लॅब ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याने त्याच्या घरातील लोखंडी सोफा ओएलएक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री संकेतस्थळावर विक्रीसाठी १६ जुलै रोजी टाकला होता. ओएलएक्स वरील जाहिराती वरून त्या रात्री एका इसमाने फोन केला.
स्वतःचे नाव अनिल कुमार सांगत त्याने आपले अंधेरी येथे स्टार फर्निचर नावाचे दुकान असून तुमचा सोफा खरेदी करायचा असल्याचे सांगितले. सोफाची किंमत प्रसाद यांनी ६९९९ रुपये इतके टाकली होती. व्यवहाराचे बोलता बोलता त्या इसमाने प्रसादला क्यूआर कोड पाठवला आणि त्यावर एक रुपया पाठवा, मी परत २ रुपये पाठवतो. असे रक्कम वाढवत क्यूआर कोड पाठवून त्या द्वारे तब्बल ६३ हजार ५०० रुपये प्रसाद व त्याचे वडील अनुप यांच्या खात्यातून लांबवली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच प्रसादने कॉल कट केला पण तो पर्यंत उशीर झाला होता.
याप्रकरणी प्रसाद याने नवघर पोलिस ठाणे व सायबर सेल ला तक्रार केल्यानंतर १९ जुलै रोजी नवघर पोलिसांनी त्याची फिर्याद घेत गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तीं सोबत क्यूआरकोड , ओटीपी आदींची माहिती शेअर करू नये व त्यांच्याशी व्यवहार करू नये असे आवाहन केले जात आहे.