ट्रॅव्हल्सच्या नावावर बुकिंग करत फसवणूक, कंपनीच्या लॉगिन, पासवर्डचा वापरमुंबई : विमान प्रवासाची तिकिटे बुकिंगच्या नावाखाली ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचे काम करणाऱ्या कंपनीच्या लाॅगीन आणि पासवर्डचा वापर करत चार लाखांची फसवणूक केल्याची घटना सायनमध्ये घडली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायन पूर्व परिसरात ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचे काम करणाऱ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लाॅगीन आणि पासवर्ड देण्यात आले होते. कंपनीच्या व्यवस्थापकांना १७ डिसेंबरला एक मेल आला.
त्यात कंपनीने ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत क्रेडिटवर घेतलेल्या आठ लाख ६५ हजार १२३ रुपयांच्या बिलाची रक्कम नमूद केली होती. कंपनीने केलेल्या तपासणीत यातील दोन तिकिटे ही कंपनीने दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले. इंडिगो विमान कंपनीची कोचीन ते मुंबई आणि गो एअर कंपनीचे मुंबई ते कोचीन अशा एकूण नऊ जणांची तिकिटे कंपनीचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून काढण्यात आल्याचे दिसले. तीन लाख ९२ हजार ५३२ रुपये किमतीची ही तिकिटे होती.
कंपनीने केलेल्या चौकशीत, कुर्ला येथून ९ डिसेंबरला या तिकिटांचे बुकिंग झाल्याचे आयपी ॲड्रेसवरून स्पष्ट झाले. महत्त्वाचे म्हणजे, बुकिंग केलेल्या तिकिटांवरून कोणत्याही प्रवाशाने प्रवास केला नाही. पैसे रिफंड करण्यासाठी कंपनीकडे अर्ज किंवा संपर्क साधला गेला नाही. कंपनीकडून बुकिंग झाले नसतानाही तिकिटे बुकिंग करून कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. यातून अधिक माहिती येण्याची शक्यता वर्तविली आहे.