मुंबई - पीएमसी बँकप्रकरणीमुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयच्या प्रशासक यांच्या आदेशावरून जसबीर सिंग मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीएमसी या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा संचालक वाढवा यांनी २००८ ते २०९ या कालावधीत पीएमसी बँक, भांडुप (प.) या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित केले नाही आणि त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक आरबीआयपासून लपवून ठेवली आणि कमी कर्ज रक्कमेच्या बनावट कर्ज खात्यांचा बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून आरबीआयला माहिती सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रक्कमेचे नुकसान झाल्याचे आढळून आले आणि हा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. गैरव्यवहाराचे रक्कमेमध्ये आणि मोठ्या कर्जप्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली कंपनी हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीज असून त्यांनी बँकेच्या पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीररित्या कर्ज प्राप्त करून घेतले आणि परतफेड देखील केली नाही. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.