मुरादाबाद – जीवन विमा पॉलिसी काढण्यासाठी तुम्हाला नेहमी कॉल येतात का? बऱ्याचदा इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पॉलिसी काढण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहक गोळा करावे लागतात. जितकी जास्त पॉलिसी काढाल तितके कमिशन कर्मचाऱ्यांना मिळत असतं. त्यामुळे कर्मचारी ग्राहकांना पॉलिसी काढण्यासाठी गळ घालत असतात. मात्र यूपीतील मुरादाबादमध्ये जे घडलं ते ऐकून पोलिसही हैराण झालेत.
मझोला आणि सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शनिवारी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात २ महिला आणि तिच्या ३ साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नोकरीचं आमिष दाखवून तरुणींना देहविक्री करण्यास भाग पाडलं जायचं. या आरोपींच्या जाळ्यातून पोलिसांनी २ युवतींची सुटकाही केली आहे. आरोपी खासगी कंपनीत विमा पॉलिसी देण्याचं काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितले.
आरोपी समोरच्याला फसवण्यासाठी विमा पॉलिसीसोबत मोफत सेक्सची सुविधा देत होते. ज्यामुळे जास्तीत जास्त लोक यांच्याकडे पॉलिसी काढण्यास यावेत यासाठी आरोपींनी ही सुविधा दिली होती. या आरोपींनी पश्चिम बंगालमधील दोन युवतींना यासाठी जाळ्यात ओढलं होतं. नोकरीच्या बहाण्याने या तरुणींना मुरादाबाद इथं आणलं त्यानंतर त्यांच्याकडून देह व्यापार करायला लावला. पोलिसांच्या माहितीनुसार, रामपूरच्या रहिवासी महिलेने चौकशीत सांगितले की, ४ वर्षापूर्वी तिने विमा एजेंट म्हणून काम सुरु केले होते. महिना झाला तरी एकही पॉलिसी काढता आली नाही. कंपनीकडून वारंवार पॉलिसी काढण्यासाठी दबाव वाढत होता. ६ महिन्यात केवळ २ पॉलिसी मिळवण्यात मला यश आलं. त्यानंतर महिलेने शक्कल लढवत पॉलिसी घेणाऱ्यांना सेक्स सुविधा देण्यास सुरुवात केली.
आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, सेक्स सुविधा दिल्यानंतर केवळ एका महिन्यात तिने ९ पॉलिसी काढल्या होत्या. त्यामुळे एका महिन्यात तिला ७५ हजार रुपये कमिशन म्हणून मिळाले. दुसऱ्या महिन्यात १५ पॉलिसी काढल्या. पॉलिसी काढणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. या रॅकेटमध्ये खिरुवा गावातील राहुल दास, धीरज भटनागर, राजू आणि अमरोहा येथील महिलेला अटक केली आहे. यात पोलिसांच्या पथकात पोलीस निरीक्षक इंदु सिद्धार्थ, रवींद्र प्रताप सिंह, जीत सिंह, प्रदीप कुमार, उज्ज्वल राणा, कॉन्स्टेबल निखील, विशाल रावत, अन्नू तोमर, सविता, देवेंद्र सिंह, आकाश शर्मा, महिला कॉन्स्टेबल नीरज कुमारी, रजनी यांचा सहभाग होता.