लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फ्रान्सच्या व्हिसासाठी सादर झालेली कागदपत्रे बनावट असल्याचे ठावूक असूनही अर्जदारांकडून पैसे घेत त्यांना व्हिसा जारी केल्याप्रकरणी चार अर्जदार आणि फ्रान्स वकिलातीमधील दोन भारतीय कर्मचाऱ्यांवर सीबीआयने दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथील चार तरुणांना फ्रान्समध्ये रोजगारासाठी जायचे होते. परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी मुळात तिथे नोकरी लागल्याचे पत्र तसेच संबंधित कंपनीकडून नोकरी मिळालेल्या व्यक्तीच्या नावे व्हिसासाठी पत्र दिले जाते. मात्र, या तरुणांकडे असे कोणतेही पत्र नव्हते. तरीही या तरुणांनी बंगळुरू येथील एका कंपनीने त्यांची नेमणूक फ्रान्स येथील कार्यालयात केल्याचे बनावट पत्र सादर करत व्हिसासाठी अर्ज केला होता. तसेच, व्हिसा कार्यालयातील दोघांशी संगनमत केले.
व्हिसा कर्मचाऱ्यांनी याकरिता या तरुणांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये स्वीकारत त्यांना कौन्सुलेटच्या मुख्याधिकाऱ्याच्या परवानगीशिवायच व्हिसा जारी केला होता. तसेच, कालांतराने या अर्जदारांची कागदपत्रे असलेली फाईल गहाळ केली होती. अशा पद्धतीने बनावट व्हिसा जारी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. हा घोटाळा १ जानेवारी २०२२ ते ६ मे २०२२ या कालावधीमध्ये झाला आहे. या प्रकरणी सीबीआयने तपासाअंती बनावट व्हिसा प्राप्त करणारे चार अर्जदार आणि व्हिसा कार्यालयातील दोन कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घोटाळ्याची व्याप्ती मोठी ?फ्रान्स व्हिसा कार्यालयातील ज्या दोन व्यक्तींवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी पंजाबमधील अनेक शेतकऱ्यांच्या व्हिसा अर्जाची हाताळणी केल्याचे सीबीआयच्या तपासात दिसून आले आहे. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांची आता कसून चौकशी केली जात आहे. या दोघांनी अनेक लोकांना कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्याशिवायच व्हिसा जारी केल्याचा सीबीआयला संशय आहे.