जळगाव : दारु आणण्यासाठी दुचाकी न दिल्याच्या रागातून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजता शिवाजी नगरातील बौध्द विहारजवळ घडली. अरुण हरी पवार (४०, रा.के.सी.पार्क, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून संशयित सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल (रा.इंद्रप्रस्थ नगर) याला अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश मधुकर जोहरे (राधाकृष्ण नगर), नवल मधुकर सपकाळे (के.एच.पार्क), सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल व अरुण हरी पवार (रा.के.सी.पार्क) या चौघांनी सोमवारी रात्री १० वाजता शिवाजी नगरातील बौध्द विहारजवळ असलेल्या चिकनच्या हातगाडीवर सोबत मद्य प्राशन केले. आणखी दारु आणण्यासाठी काल्याने अरुण याला दुचाकी मागितली, परंतु अरुणने त्यास नकार दिला. त्यामुळे काल्या याला त्याचा राग आला व त्यातून तो अरुणला शिवीगाळ करुन मारहाण करायला लागला. त्यात त्याने जवळच असलेली फरशी अरुणच्या डोक्यात टाकली. प्रचंड रक्तबंबाळ झालेल्या अरुणला इतर मित्रांनी तातडीने जवळच असलेल्या डॉक्टरकडे नेले नंतर परत त्याच जागेत आणून सोडले. त्यानंतर नवल सपकाळे याने अरुणचे घर गाठून पत्नी रत्नाबाई हिला वादाची माहिती दिली.
चार दवाखाने फिरविलेया घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नाबाई पवार हिने भाचा आकाश कैलास पाटील, शेजारी कुंदन वसंत निकम, मंगेश जोहरे, अभिराज उर्फ गौरव विश्वास चव्हाण यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. रिक्षात टाकून अरुण याला जिल्हा रुग्णालय, तेथून खासगी रुग्णालयात नेले. नंतर देवकर रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, पत्नी रत्नाबाई हिच्या फिर्यादीवरुन सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल्याला रात्रीच पोलिसांनी इंद्रप्रस्थ नगरातून अटक केली आहे.