Murder for iPhone, Crime News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. सुलतानपूर पोलिसांनी एका तरुणाच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली. त्या मारेकऱ्यांमध्ये एक जण मृताचा मित्रच असल्याची माहिती आहे. एका मुद्द्यावरून मित्रांचा वाद सुरू झाला. त्यातच एका मित्राने दुसऱ्या मित्राचा iPhone तोडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी iPhone वाल्या मित्राने दुसऱ्या मित्राचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आदित्य सिंग, यशवंत सिंग, सौरभ पाठक आणि अभिनव सिंग अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (एसएससी) परीक्षेची तयारी करत आहेत.
iPhone तोडला म्हणून घेतला जीव
१० जुलैच्या रात्री अटक करण्यात आलेल्या चार आरोपींनी आपला मित्र गौरव सिंह याची हत्या केल्याचा आरोप आहे. सुलतानपूरचे एसपी सोमेन बर्मा यांनी सांगितले की, आरोपींनी चौकशी दरम्यान खुलासा केला आहे की काही दिवसांपूर्वी गौरवचा मित्रांशी किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला होता. वादात गौरवने सौरभचा आयफोन तोडला. या प्रसंगामुळे सौरभ प्रचंड संतापला. त्यानंतर सौरभने प्रथम त्याचा मित्र यशवंत याच्यामार्फत देशी बनावटीच्या पिस्तुलाची व्यवस्था केली. त्यानंतर पटेल चौक क्रॉसिंग जवळ त्याने गौरववर मागून गोळी झाडून त्याची हत्या केली.
कर्ज काढून घेतला होता iPhone
सुलतानपूरचे एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत गौरव सिंग हे दोघेही गेल्या दहा वर्षांपासून सरकारी शाळेत एकत्र शिकत होते. गौरव सिंग त्याच्या बाहेरील स्थानिक मित्रांसह त्याला धमक्या देत असे. यापूर्वीही त्याने आरोपींना मारहाण केली होती. तसेच त्यांचे पैसे हिसकावून घेतल्याचा आरोप होता. अलीकडच्या काही दिवसांत मृत गौरव सिंग याने सौरभचा मोबाईल फोन तोडला. iPhone हा मोबाईल फोन सौरभने कर्ज घेऊन विकत घेतला होता. तो फोन गौरवने तोडल्यामुळे सौरभने त्याचा जीव घेतला.
असा रचला होता कट
पोलिसांच्या माहितीनुसार, 'त्या दिवशी गौरव सिंग एकटाच रस्त्यावरून जात होता. त्या घटनेचा फायदा घेत आरोपी सौरभने, यशवंतकडून घेतलेल्या देशी पिस्तुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पाळत ठेवून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक करण्यात आली.