वाकड : पत्नीबाबत अपशब्द बोलल्याचा राग अनावर झाल्याने दोघा मित्रांनी दारूच्या नशेत तरुणाचा गळा दाबून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह नदी पात्रात फेकून दिला. मात्र, खबऱ्याने फोनवर माहिती दिल्याने आरोपींपर्यंत तात्काळ पोहचून त्यांना अटक करण्यात वाकडपोलिसांना यश आले.रोहित किसन कांबळे (वय १९, रा. वाकड) असे अपहरण करून खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई मीना किसन कांबळे (वय ४५) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इलियाज शेख (वय ३०, रा. पवारनगर, थेरगाव) आणि आकाश साळवे (वय २५ रा. रहाटणी) यांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित कांबळे हा ३ ऑक्टोबर रोजी दांडिया खेळण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला. मात्र दोन दिवस उलटूनही तो घरी न आल्याने रोहितच्या आईने वाकड पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली होती. शनिवारी (दि. ९) वाकड तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना एका खबऱ्याने रोहित कांबळे याचा खून झाल्याची माहिती दिली. माने यांनी एक पथक संशयित आरोपींच्या मागावर रवाना केले. पथकाने चार तासातच आरोपी जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी कल्याणीनगर येथे शोध घेतला. रविवारी दुपारी कांबळेचा मृतदेह मिळून आला. खुनाचा गुन्हा आरोपींविरोधात पोलिसांनी दाखल केला आहे.आरोपी व मयत कांबळे हे तिघेजण रिक्षाचालक असून एकमेकांचे मित्र आहेत. गुरुवारी (दि. ३) सायंकाळी आरोपींनी दारू पिण्याच्या बहाण्याने कांबळेला तळेगाव येथे नेले. नशेत कांबळे याने आरोपींपैकी एकाच्या पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. यातच दोघांनी कांबळेचा गळा दाबून त्याचा खून केला. काही वेळाने भानावर आलेल्या आरोपींना खून झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे भांबावलेल्या आरोपींनी कांबळेचा मृतदेह रिक्षातूनच थेरगाव येथे आणला. मात्र, थेरगावमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास योग्य जागा मिळत नसल्याने ते पुण्यातील संगमवाडीपर्यंत गेले. तेथे नदीपात्रात मृतदेह फेकून आरोपी घरी आले.
पत्नीबाबत अपशब्द बोलल्याने मित्रानेच गळा दाबून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 7:02 PM
मृतदेह नदीपात्रात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न...
ठळक मुद्देतिघेजण रिक्षाचालक असून एकमेकांचे मित्र