लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पैशाच्या वादातून चाैघांनी एका तरुणाची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. आकिब अब्दुल सत्तार (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून तो हसनबागमध्ये राहत होता. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे श्रावणनगर वस्तीत प्रचंड थरार निर्माण झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत आकिब सत्तार आणि आरोपी पक्या ऊर्फ प्रकाश भीम कोसरे (वय २२, रा. श्रावणनगर, वाठोडा) हे दोघे चांगले मित्र होते. आकिबने काही दिवसांपूर्वी आरोपी पक्याला २० हजार रुपये उधार दिले होते. ते परत देत नसल्यामुळे आकिब आणि पक्याचा वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर, आकिबला पक्याने मंगळवारी दुपारी आपल्या घराकडे बोलवून घेतले. तो तिकडे जाताच पक्या आणि त्याच्या तीन मित्रांनी त्याला मैत्रेय बुद्ध विहाराजवळ नेले. तेथे आरोपी पक्या, फल्ली ऊर्फ विशाल पृथ्वीराज गुप्ता (वय २०) आणि अजय बोकडे (वय २१) तसेच एक अल्पवयीन साथीदार यांच्याशी आकिबची बाचाबाची झाली. यावेळी एकाने अकिबच्या डोक्यावर लाठी हाणली. तो खाली पडताच आरोपींनी धारदार सत्तुराने अकिबचा बोकड कापल्यासारखा गळा कापला.
श्रावणनगर ही सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे. हत्येच्या वेळी बाजूच्या महिला दैनंदिन कामात गुंतल्या होत्या. त्यांनी तो थरार पाहून भीतीमुळे आरडाओरड सुरू केली. ती ऐकून परिसरातील मंडळी गोळा झाली. त्यांनी पोलिसांना कळविले. दरम्यान आरोपी तेथून पळून गेले. बुद्धविहाराजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील वातावरण संतप्त झाले.
घटनेची माहिती कळताच वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे ताफ्यासह श्रावणनगर वस्तीकडे धावले. पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट दिली. वातावरण बिघडू नये म्हणून त्यांनी शीघ्र कृती दलाची तुकडीही या भागात तैनात केली. धावपळ करून वाठोडा पोलिसांनी काही वेळेतच चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील एक अल्पवयीन (१७ ते १८ वर्षे दरम्यान वयाचा) असल्याचे समजते.
गेम करण्याची आधीच तयारी
आरोपींनी आकिबचा गेम करण्याची आधीच तयारी केली होती. त्यामुळे त्यांनी आकिबचा फोन येताच ‘पैसे देतो, असे आमिष देऊन त्याला बोलवून घेतले. तो येईपर्यंत आरोपींनी सत्तूर आणि काठी आणून ठेवली. आकिबने पैसे मागताच त्याच्याशी वाद घालून त्याची निर्घृण हत्या केली.
काम दुसरे, वृत्ती गुन्हेगाराची
मृत आकिब ऑटो चालवित असला तरी तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध लकडगंज आणि वाठोडा ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहे. पक्या आणि इतर दोघे पेंटिंग करतात. विशाल मुंगफल्ली विकतो म्हणून त्याचे टोपण नाव फल्ली आहे. आरोपी पक्या, फल्ली आणि अन्य एकावर कलम ३०७, ३२५, ३९५ असे गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ३१ डिसेंबरला एकावर प्राणघातक हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.