औरंगाबाद : कॅनॉट प्लेस सिडको येथील दोन हॉॅलचे नोंदणीकृत खरेदीखत करून घेताना ठरल्यानुसार धनादेश आणि रोख रक्कम घरी आणून देण्याचे आश्वासन देऊन ते न पाळता मित्राची तब्बल ३९ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही फसवणूक सिडकोतील कॅनॉट प्लेस येथील कैलास आर्केड येथे २ ते १० आॅक्टोबर २०१७ दरम्यान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
सतीश श्रीराम जाधव (४०, रा. श्रीकृष्णनगर, बीड बायपास परिसर) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. सिडको पोलिसांनी याविषयी सांगितले की, सिडको एन-३ येथील रहिवासी अमित विनायकराव बोरसे आणि आरोपी सतीश हे यांच्यात मित्रत्वाचे संबंध होते. अमित यांनी सतीशकडून व्यवसायासाठी २२ लाख रुपये उसने घेतले होते. जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवसायात अमित यांना नुकसान झाल्याने ते सतीश यांचे पैसे मुदतीत देऊ शकले नव्हते. यामुळे सतीश यांनी त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. कॅनॉट प्लेसमधील एलोरा कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यातील दोन हॉल आपल्या नावे करून दे म्हणून मानसिक त्रास देत, जगू न देण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर सतीशने ७५ लाख ७५ हजार रुपयांत हे दोन्ही हॉल खरेदी करण्याचा सौदा केला.
या व्यवहारानुसार सतीश हे २५ लाखांचे धनादेश आणि रोख १७ लाख हे अमित यांना देण्याचे ठरले होते. अमित यांनी सतीश यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या नावे खरेदीखत करून दिले; परंतु आरोपीने खरेदीखतामध्ये पाच लाखांचा एक आणि दहा लाखांचे दोन धनादेश असे एकूण २५ लाख रुपये धनादेशाद्वारे आणि रोख १७ लाख ७५ हजार रुपये १० आॅक्टोबर २०१७ रोजी अमित यांना देण्याचे ठरले होते. खरेदीखत करून दिल्यानंतर मी धनादेश आणि रोख रक्कम घरून घेऊन येतो, असे तक्रारदार यांना सांगून आरोपी निघून गेला.
एवढेच नव्हे तर खरेदीखतात बनावटीकरण करून तक्रारदार यांना ११ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे दिल्याचा उल्लेख केला. आरोपीने विश्वासघात करून आपली फसवणूक केल्याची तक्रार अमित यांनी सिडको ठाण्यात आज नोंदविली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी.बी. ठुबे तपास करीत आहे.
खरेदीखतात बनावटीकरण केल्याचा आरोपआरोपी सतीश जाधव यांनी खरेदीखतातही बनावटीकरण करून ११ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे अमित यांच्या खात्यात वर्ग केल्याचे नमूद केले. वास्तविक अशा प्रकारची रक्कम जाधव यांच्या खात्यातून अमित यांना प्राप्त झालीच नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.