मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये एका अल्पवयीन मुलाची त्याच्या मित्रांनी हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. मोबाइलवर फ्री फायर गेम खेळण्यासाठी त्याला गावाबाहेर बोलावण्यात आले. त्यानंतर खेळताना गेमच्या टास्क प्रमाणे मित्राची मान जोरात फिरवली. नंतर त्याच्या मानेचे हाड तुटले आणि त्याचा मृत्यू झाला. ही बाब इतर कोणाला कळू नये म्हणून त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. मुलगा घरी पोहोचला नाही म्हणून कुटूंबियांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा पोलीस चौकशीत आरोपी पकडले गेले. दोन आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे.
रतलामच्या आलोटपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दयालपुरा गावातील ही धक्कादायक घटना आहे. मृत मुलाचे नाव विशाल सिंह असून तो १५ वर्षांचा होता. तो नववीत शिकत होता. आरोपी उल्फत सिंह (१८) आणि १६ वर्षांचा एका अल्पवयीन मुलगा हे त्याचे मित्र होते. तिघांना मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशालचे वडील नेपाल सिंह यांनी त्यांचा मुलगा शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. रात्री ९ वाजता एक कॉल आल्यानंतर मृत मुलाने आपल्या वहिणीला बाहेर जात असल्याचं सांगून गेला होता अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घरी न परतल्याने त्याला रात्रभर शोधूनही तो सापडला नाही. दरम्यान कुटुंबीयांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर गावात चौकशी सुरू केली. विशाल शेवटचा उल्फत आणि दुसऱ्या एका मित्राबरोबर बाईकवर जाताना दिसला होता, अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली तर ते पोलिसांच्या प्रश्नाला प्रतिसाद न देता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला.
विशालने आरोपींची सिगारेट ओढणे, तंबाकू खाणे आणि मुलींशी संबंध असल्याबाबत वाईट सवयींची माहिती त्यांच्या कुटुबीयांना सांगितलं होतं. त्यामुळे तो विशालवर संतापलेला होता आणि त्याला बदला घ्यायचा होता म्हणून त्याची हत्या केली. त्यामुळे त्याने आधी विशालला गेम खेळण्यासाठी बोलवलं आणि बाईकवरून त्याला गावापासून लांब असलेल्या एका ठिकाणी नेलं. याठिकाणी त्यानं आधीच खड्डा खोदून ठेवला होता. गेममध्ये ज्याप्रकारे टास्क असतो तशाप्रकारे दोघांनी वेगाने विशालची मान गोल फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या मानेचं हाड तुटलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मृतदेह खड्ड्यात पुरला आणि वर माती आणि दगड टाकले.
अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात तर दुसऱ्या आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही गळ्याचं हाड तुटल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आले. हा खून रागाच्या भरात केला असला तरी त्यासाठी वापरलेली गुन्ह्याची पद्धत ही गेममधून शिकलेली होती.