मीरारोड - सरकारी जागेत बेकायदा लॉजिंगचे बांधकाम केल्याची तक्रार करणाऱ्या तक्रादारावर मंडळ अधिकारी, तलाठी आदींच्या समोरच प्राणघातक हल्ला लॉज चालकांनी केल्याची घटना काशिमीरा येथे घडली आहे. विशेष म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतली. मीरा गाव येथील महाजन वाडी मध्ये सरकारी जागेत महाविष्णू मंदिर आहे. याच मंदिराच्या बांधकामात सोना नावाने बेकायदा लॉज चे बांधकाम चालवले होते. या प्रकरणी काही तक्रारदारांनी तक्रारी चालवल्या होत्या. एका संस्थेच्या माध्यमातून इरबा कोनापुरे यांनी सुद्धा तक्रार केली होती. महापालिकेचे अधिकारी सदर बेकायदेशीर बांधकामा वर कारवाई करण्यास चालढकल करत होते. तर सरकारी जागा असून देखील महसूल विभागाने सुद्धा डोळेझाक चालवली होती. इरबा यांनी पाठपुरावा चालवल्याने आज गुरुवारी मंडळ अधिकारी दीपक अनारे, तलाठी अभिजित बोडके सह मोहन, जितू, विलास हे लॉज ची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी तक्रारदार इरबा यांना सुद्धा बोलावून घेतले. अनारे हे तलाठी व सोबतच्या व्यक्तींसह मोजमाप घेऊन कागदपत्रे तपासू लागले. त्यावेळी आलेल्या लॉज चालक श्याम कोरडे, योगेश गौडा व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत इरबा वर हल्ला चढवला. त्यांना मारहाण करत खाली नेण्यात आले. तेथे एका गाळ्यात डांबून मारहाण करण्यात आली. इतका सगळा प्रकार होत असताना अनारे, बोडके आदींनी बघ्याची भूमिका घेतली. पोलीसांना सुद्धा पाचारण केले नाही. लॉजवाल्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून काशिमीरा पोलीस ठाणे गाठले. इरबा यांना जबर मारहाण झाली असून अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी जबाब नोंदवण्याची कार्यवाही करत होते.
सरकारी जागेत लॉज बांधकामाची तक्रार करणाऱ्यावर महसूल अधिकाऱ्यांसमक्ष हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 8:41 PM
विशेष म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतली.
ठळक मुद्देमीरा गाव येथील महाजन वाडी मध्ये सरकारी जागेत महाविष्णू मंदिर आहे. याच मंदिराच्या बांधकामात सोना नावाने बेकायदा लॉज चे बांधकाम चालवले होते. या प्रकरणी काही तक्रारदारांनी तक्रारी चालवल्या होत्या.