पुणे : सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी एका स्क्रॅप व्यावसायिकाच्या कार्ड दुसऱ्या कार्डवर ट्रान्सफर करुन तब्बल ४ लाख ८९ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी कमलेश प्रकाशचंद जैन (वय ३८, रा. गिरगाव रोड, मुंबई) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी येथील तनिषक अपार्टमेंटमध्ये फिर्यादी असताना २३ व २४ जुलै दरम्यान आॅनलाईनद्वारे घडला.
सायबर चोरट्याने फिर्यादी जैन यांच्या मोबाईलवर संपर्क साधला.त्यांना एअरटेल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. तुमचा इंटरनेट पॅक आज संपणार आहे, असे सांगून बाहेर लॉकडाऊन असल्याने आम्ही आॅनलाईन रिचार्ज करुन देतो, असे सांगितले. सुरुवातीला जैन यांनी त्याला नकार दिला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना तुम्ही रिचार्ज केले नाही तर तुमचे सिमकार्ड बंद होईल, असे सांगून घाबरविले.त्यानंतर त्यांना मोबाईलमधील एअरटेल थँक्स या अॅपमधून १० रुपयांचे रिचार्ज करण्यास भाग पाडले. त्यानंतर दुपारी पुन्हा फोन करुन त्यांना रिचार्ज झाले असल्याचे खोटेच सांगितले. त्यावरुन जैन यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर जैन यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज पाठवून, तो १२१ नंबरवर पाठविण्यास सांगितला. त्याप्रमाणे जैन यांनी करताच त्यांचा मोबाईल बंद झाला. व त्यांच्या सिमकार्डचा एक्सेस सायबर चोरट्यांकडील सिमकार्डकडे गेले. त्यानंतर चोरट्याने दुपारी १ ते २ या एका तासाच्या दरम्यान जैन यांच्या एचडीएफसी बँक खात्यामधून फोन पे व पेटीएमच्या माध्यमातून ४ लाख ८९ हजार ९३५ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन फसवणूक केली. .......जून अखेर १९८ तक्रारीमोबाईलधारकांना मेसेज पाठवून तो मेसेज १२१ क्रमांकावर फॉरवर्ड करायला सांगतात. त्यामुळे मोबाईलधारकाच्या सिम कार्डचा एक्सेस हा सायबर चोरट्यांकडे जातो. तो मोबाईल तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर सिम कार्डबरोबरच बँक खात्याची माहिती सायबर चोरट्यांकडे जाते व त्या आधारे सायबर चोरटे तुमचे सर्व बँक खाते रिकामे करतात. जानेवारी ते जून अखेरपर्यंत अशा प्रकारचे सिम स्वॉपिंग आणि कार्ड क्लोनिंग करुन १९८ मोबाईलधारकांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. याशिवा गेल्या वर्षीच्या तब्बल १३८ तक्रारीची तपास प्रलंबित आहे.अशाप्रकारे जूनअखेर तब्बल ३३६ तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.