बंगळुरू - कर्नाटकच्या बंगळुरू इथं १२ जूनच्या सकाळी माइको लेआऊट पोलीस स्टेशनला सर्व अधिकारी-कर्मचारी ड्युटी करत होते. तेव्हा पोलीस ठाण्याबाहेर एक ऑटो थांबली, त्यातून महिला बाहेर आली. तिच्या हातात निळ्या रंगाची ट्रॉली बॅग होती. महिला बॅग घेऊन पोलीस ठाण्यात आली. या महिलेला तक्रार नोंदवायची असेल तर तिथल्या पोलिसांना वाटलं परंतु या महिलेने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला.
या महिलेचं नाव सोनाली सेन असून ती फिजियोथेरेपिस्ट आहे. या महिलेला पोलिसांनी विचारलं असता तिने तिच्या आईची हत्या केल्याचं म्हटलं. महिला मानसिक आजारी आहे असं पोलिसांना वाटत होते. परंतु महिलेने आईची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलीस ताडकन् उभे राहिले त्यांनी महिलेच्या हातातील बॅग उघडली असता त्यात एका वृद्ध महिलेचा मृतदेह असल्याचे समोर आले. मृतदेहाचे हात-पाय बांधून सूटकेसमध्ये ठेवले होते. त्यात एका वृद्ध व्यक्तीचा फोटोही होता.
सोनालीने म्हटलं की हा फोटो माझ्या वडिलांचा आहे. माझी आई सारखी मला मारून टाक असं म्हणत होती. त्यासाठी मी तिला मारले. महिलेचा जबाब ऐकून तिच्यावर विश्वास ठेवणे पोलिसांना कठीण जात होते. पोलिसांनी या महिलेला खुर्चीवर बसवले आणि विस्ताराने संपूर्ण घटना विचारली. महिला पश्चिम बंगालची राहणारी आहे. तिचे वय ३९ वर्षे आहे. सोनालीने सांगितले की, मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या लग्नानंतर मी पतीसह बंगळुरुला शिफ्ट झाली. सासरी पती आणि सासू होती. तर माझे आई-वडील कोलकाताला राहत होते.
काही वर्षापूर्वी वडिलांचं आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर आई एकटीच पडली. आईची काळजी घ्यायला कुणी नव्हते. त्यासाठी मी आईला बंगळुरूला घेऊन आली. सुरुवातीचे काही दिवस चांगले चालले होते. त्यानंतर आई आणि माझ्या सासूमध्ये वाद होऊ लागले. दोघांमध्ये सुरळीत नव्हते. रोजच्या भांडणाला वैतागून मी नोकरी सोडली जेणेकरून घरातील भांडणे थांबतील. परंतु तरीही भांडणे सुरूच होती. रविवारी किरकोळ कारणावरून वाद झाले. तेव्हा सोनाली आणि पतीने ते शांत केले. सोनाली तिच्या आईला समजावत होती तेव्हा आई तू मला मारून टाक, तेव्हाच ही भांडणे संपतील आणि तुझं आयुष्य सुरळीत होईल असं म्हटलं.
सोनालीने आईला समजावलं असं काही बोलू नकोस, ती रात्र कशीबशी गेली. परंतु सकाळी सोनालीचे डोळे उघडले तेव्हा पुन्हा आई आणि सासूमध्ये वाद सुरू झाले. पती नोकरीला गेला होता. सोनालीने पुन्हा दोघांना समजावत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. सासूच्या तिच्या खोलीत पाठवले आणि आईला घेऊन सोनाली दुसऱ्या खोलीत आली. तिने आईला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने पुन्हा तू मला मारून टाक असं म्हणाली. त्यानंतर सोनालीने आईला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तुझ्या मृत्यूनंतरच माझे आयुष्य सुधारेल असं म्हटलं. आईने गोळ्या खाल्ल्यानंतर सोनालीने गळा दाबून तिला संपवलं.
सोनालीने पोलिसांना सांगितले की, या घटनेबाबत सासू आणि पतीला काहीच माहिती नाही. कारण सासू त्यावेळी दुसऱ्या खोलीत होती. सोनालीचा हा जबाब ऐकून पोलिसांना तिला तात्काळ अटक केली. सध्या तिची चौकशी सुरू आहे. तर आईचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. आता पोलिसांसमोर २ प्रश्न उभे राहिलेत की खरेच सोनालीने आईची इच्छा पूर्ण केली का किंवा रोजच्या भांडणाला वैतागून तिने हे टोकाचे पाऊल उचलले? सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.