बेंगळुरू : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी स्टेजवर असतानाच एका मुलीने 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे दिल्याचा धक्कादायक प्रकार देशभर गाजतोय. या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यात हीच तरुणी हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देतानाही दिसतेय. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, यावरून चर्चा रंगली आहे.
एमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या 'आपण १५ कोटी, ते १०० कोटी', या वक्तव्यावरुन वादंग सुरू असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूच्या सभेत गुरुवारी (20 फेब्रुवारी) गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. बंगळुरुमधील सीएएविरोधी आंदोलनादरम्यान एका तरुणीने माईकवरुन 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली आणि ओवेसींसह संयोजकांना धक्काच बसला होता. 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला - अमुल्याला अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मात्र, या तरुणीनं 'पाकिस्तान झिंदाबाद'नंतर 'हिंदुस्थान झिंदाबाद'च्या घोषणाही दिल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय.
अमुल्याने पाकिस्तान झिंदाबादचे नारे देताच ओवेसींसह इतर काहीजण तिला थांबविण्यासाठी धावले. तरीही अमुल्याने घोषणा सुरूच ठेवल्या. नंतर तिच्या हातातून माईक काढून घेण्याचा प्रयत्न झाला. तिने तो सोडवून घेत हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. हे पाहून तिच्या मागे उभ्या असलेल्या एका तरुणानेही हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच हा नेता नंतर सर्वांना समजावून बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होता, असं व्हिडीओत दिसतंय.
हातातून माईक काढून घेतल्यानंतरही अमुल्या व्यासपीठावर पुढे येऊन काहीतरी बोलताना दिसतेय. 'डिफरन्स बिटवीन' असं काहीतरी या व्हिडीओत ऐकू येतंय. मात्र, तेवढ्यात पोलीस आणि कार्यकर्ते तिला व्यासपीठावरून खाली उतरवतात. यावेळी रॅलीमध्ये जमलेल्यांचा मोठा आवाज ऐकू येतो. त्यामुळे अमुल्याला नेमकं काय बोलायचं होतं, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, अमुल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमुल्याला जामीन मिळता कामा नये. तिचे नक्षल्याशी संबंध असल्याचे सिद्ध होत आहे. तिला शिक्षा झाली पाहिजे. तिच्या वडिलांनीही तिची पाठराखण केलेली नाही, अशी भूमिका येडियुराप्पा यांनी घेतलीय.
ओवेसींच्या मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक
महाकाल एक्स्प्रेसमधून भगवान शंकर प्रवास करणार; कायमस्वरुपी सीट आरक्षित
Jio ची 2020 ऑफर बंद, नवीन जारी; तरीही Airtel ठरणार भारी
छोट्याशा जागेतही कार कशी पार्क करता येते? आनंद महिंद्रांकडून स्तुती